‘आर्टेमिस-3’ मोहिमेत चंद्रावरील जीवसृष्टीचा लागेल शोध? | पुढारी

‘आर्टेमिस-3’ मोहिमेत चंद्रावरील जीवसृष्टीचा लागेल शोध?

वॉशिंग्टन : चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. शनीला शंभरपेक्षा अधिक आणि गुरूला नव्वदपेक्षाही अधिक चंद्र आहेत हे विशेष. आपल्या या एकमेव चंद्राबाबत नेहमीच माणसाला कुतुहल वाटत आलेले आहे. माणूस अनेकवेळा चांद्रभूमीवर जाऊनही आलेला असला तरी अद्यापही चंद्राची पुरती माहिती मानवाला नाही. चंद्र कोरडाठाक आहे असे अनेक वर्षे मानले जात होते.

मात्र, भारताच्याच ‘चांद्रयान-1’ मोहिमेतून प्रथमच चंद्रावर पाण्याचेही अस्तित्व आहे हे जगाला समजले. आता तर असे म्हटले जात आहे की चंद्रावर जीवसृष्टीचेही अस्तित्व आहे. चंद्राची अज्ञात बाजू तसेच तेथील बर्फाळ विवरे यांचे गूढ अद्याप उकलले नाही. आता ‘नासा’च्या आगामी ‘आर्टेमिस-3’ मोहिमेत तेथील जीवसृष्टीचा छडा लागू शकतो असे म्हटले जात आहे.

डिसेंबर 1972 मधील ‘अपोलो 17’ या मोहिमेनंतर अद्याप मानवाचे पाऊल चंद्रावर पडलेले नाही. ‘आर्टेमिस-3’ मोहिमेत माणूस पुन्हा एकदा चांद्रभूमीवर उतरेल. ही मोहीम विशेषतः चंद्राच्या ध्रुवीय भागाला लक्ष्य बनवून आखण्यात आलेली आहे. ‘आर्टेमिस-3’ साठी सुरक्षित आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून महत्त्वाचे लँडिंगचे ठिकाण शोधणे हे कठीण काम होते.

मात्र, चंद्रावर जीवसृष्टीचा शोध घेण्याचे आश्चर्यकारक कामही यामधून होऊ शकते. चंद्रावरील काही विवरे कायमची अंधारात असून ती अतिशय थंड आहेत. दक्षिण ध्रुवावरील अशा विवरांमध्ये जीवसृष्टीचा शोध घेतला जाऊ शकतो. ही जीवसृष्टी सूक्ष्म जीवांच्या स्वरूपातील असू शकते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील खडतर स्थितीत असे सूक्ष्म जीव तग धरून राहिलेले असू शकतात असे संशोधकांना वाटते. ‘नासा’च्या ग्रीनबेल्ट येथील गोड्डार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील खगोलशास्त्रज्ञ प्राबल सक्सेना यांनी अशी शक्यता वर्तवली आहे.

Back to top button