भिशीत नाणी टाकण्याचा कुत्र्याचा विश्वविक्रम! | पुढारी

भिशीत नाणी टाकण्याचा कुत्र्याचा विश्वविक्रम!

लंडन : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मधील विश्वविक्रमांबाबत आपल्याला नेहमीच कुतुहल वाटत असते. माणसाबरोबरच अनेक पशु-पक्ष्यांनीही आपल्या नावाची नोंद या रेकॉर्ड बुकमध्ये केलेली आहे. आता एका कुत्र्याने पिगी बँकमध्ये एका मिनिटात सर्वाधिक म्हणजेच 23 नाणी टाकण्याचा एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. ब्रिटनच्या एबरडीन येथील या दोन वर्षांच्या श्वानाने केलेल्या या अनोख्या विक्रमाची सोशल मीडियावरही चर्चा आहे.

या कुत्र्याचे नाव आहे लियो. त्याच्या मालकिणीचे नाव आहे एमिली अँडरसन. लियोने हा विश्वविक्रम केल्यावर अर्थातच त्याची मालकीण खूश आहे. तिने सांगितले की या विक्रमाच्या मागे लियो आणि तिची मेहनत आहे. लियोला दोन वर्षे दीर्घकालीन प्रशिक्षण दिल्यानंतर हा विश्वविक्रम झाला आहे. सरावासाठी तो कोणत्याही वस्तू आणून भिशीत टाकत असे.

या यशानंतर इन्स्टाग्रामवर लियोचे एक छायाचित्र समोर आले आहे. त्यामध्ये तो गिनिज बुकचे प्रमाणपत्र आणि पिगी बँकसह बसलेला दिसून येतो. एका मिनिटात 23 नाणी पिगी बँकमध्ये टाकून आता त्याने आपले नाव गिनिज बुकमध्ये ‘अमर’ करून ठेवलेले आहे!

Back to top button