आता ‘एआय’ करणार वकिली! | पुढारी

आता ‘एआय’ करणार वकिली!

चेन्नई : ‘ओपन एआय’चे ‘चॅटजीपीटी’, मायक्रोसॉफ्टचे ‘बिंग’ आणि ‘गुगल’च्या ‘बार्ड’सारख्या चॅटबोटस्च्या धर्तीवर आता कायद्याच्या क्षेत्रातील ‘लिगल जीपीटी’ बनवण्याची तयारी आपल्याच देशात सुरू आहे. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी आणि टेक्नॉलॉजी लॉमध्ये याचवर्षी ‘एलएलएम’ केलेल्या चेन्नईच्या कपिल नरेश यांनी आता हे आणखी एका प्रकारचे ‘एलएलएम’ करण्याची तयारी केली आहे. हे ‘एलएलएम’ म्हणजे ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’. हे एक प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जे चॅटबोटस्सारखेच असेल.

23 वर्षांचे नरेश हे एका कायदेशीर सल्लागार फर्मचे संस्थापकही आहेत. आता ते ‘चॅटजीपीटी’च्या धर्तीवर ‘लिगल जीपीटी’ बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हा एक असा प्लॅटफॉर्म असेल जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केस रिसर्चपासून एफआयआर, चार्जशीट ड्राफ्ट करण्यासाठी तसेच कोर्टातील युक्तिवाद बनवण्यासाठीचे काम करील. एखादा दिग्गज वकील जे करील ते सर्व हे ‘लिगल जीपीटी’ करू शकेल.

नरेश यांनी सांगितले की सध्या ‘लिगल जीपीटी’ हे केवळ पहिल्या वर्षात शिकणार्‍या कायद्याच्या विद्यार्थ्यासारखेच आहे. त्याला आणखी तयार केले तर ते माझ्यासारख्या नवख्या वकिलाइतके काम करू शकेल. मी ‘लिगल जीपीटी’ला इतके मजबूत बनवू इच्छितो जे सर्वोच्च न्यायालयातील नामांकित वकिलांसारखे काम करू शकेल.

Back to top button