छत्तीसगढमध्ये हत्तींबाबत इशारा देणारे नवे अ‍ॅप | पुढारी

छत्तीसगढमध्ये हत्तींबाबत इशारा देणारे नवे अ‍ॅप

नवी दिल्ली : छत्तीसगढमध्ये गेल्या काही वर्षांपासून हत्तींची दहशत वाढत चालली आहे. अशा स्थितीत वन विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या आधारे एक नवे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून हत्तींच्या येण्या-जाण्याचा छडा लागू शकतो. या अ‍ॅपला ‘छत्तीसगढ एलिफंट ट्रॅकिंग अँड अ‍ॅलर्ट’ असे नाव देण्यात आले आहे.

वन विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की या अ‍ॅपला स्थानिक स्वयंसेवकांचे एक पथक ‘हाथी मित्र दल’ कडून इनपुट मिळतील. हे दल हत्तींच्या येण्या-जाण्याबाबतची माहिती कॉल किंवा मेसेज करून वन विभागाला देते. या समूहाच्या मदतीनेच अ‍ॅपला हत्तींबाबतची माहिती मिळेल. या अ‍ॅपच्या सहाय्याने हत्ती व मानवामधील संघर्षाच्या घटना टाळण्यास मदत मिळेल. छत्तीसगढमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये हत्तींच्या हल्ल्यात 220 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये 70 हून अधिक हत्तींचाही मृत्यू झाला आहे.

या हत्तींचा मृत्यू आजारपण, वय किंवा विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने झाला आहे. हे अ‍ॅप ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने काम करील. ‘हाथी मित्र दल’ गेल्या वर्षभरापासून या अ‍ॅपसाठी डेटा फीड करण्याचे काम करीत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अशा सर्व रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज जाईल, ज्यांच्या लोकेशनच्या दहा किलोमीटरच्या परिघात हत्तींचे येणे-जाणे असेल. व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातूनही लोकांना अलर्ट केले जाऊ शकेल. हे अ‍ॅप लोकांना कॉल आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातूनही अलर्ट करील.

Back to top button