पाकिस्तानी लष्कराची मदत थांबवा; इम्रान खान यांची अमेरिकेकडे याचना | पुढारी

पाकिस्तानी लष्कराची मदत थांबवा; इम्रान खान यांची अमेरिकेकडे याचना

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तान लष्कराला केली जात असलेली संरक्षण साहित्याची मदत थांबवावी, अशी याचना माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरिक-ए-इन्साफ या पक्षाने अमेरिकेकडे केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने बायडेन प्रशासनाची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही याचना केली आहे. लष्कराकडून मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला आहे.

याप्रकरणी सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे, गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत रॅलीदरम्यान कागदाचे तुकडे भिरकावत त्यांचे सरकार अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तानी लष्कराने पाडले असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला होता. तसेच सत्तेत असेपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इम्रान खान यांना फोन केला नव्हता. यावरून इम्रान खान यांची खिल्लीही उडवण्यात आली होती.

दरम्यान, 9 मे रोजी इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर लष्कराने हल्ले केले होते. त्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकार आणि लष्कराने इम्रान यांच्या समर्थकांवर कारवाई केली होती आणि 1 हजार 500 पेक्षा अधिक लोकांना अटक केली होती. या कारवाईनंतर इम्रान खान यांचा पक्ष विस्कटला होता.

100 पेक्षा अधिक नेते, खासदार आणि आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. इम्रान यांचे निकटवर्तीय एकटे पडले होते. आता हे लोक पाकिस्तानची लोकशाही वाचवावी, अशी मागणी जगभरातील माध्यमांकडे करत आहेत. पाकिस्तान आणि लष्कराकडून मानवाधिकारांचे उल्लघंन करत असल्याचा आरोपही इम्रान समर्थक करत आहेत. यापूर्वी इम्रान यांनी फोन करून अमेरिकेकडे मदतीची याचना केली आहे.

अंकुश लावण्याची गरज

इम्रान खान यांचे निकटवर्तीय शाहबाज गिल अमेरिकेचे नागरिकही आहेत. गिल यांच्या म्हणण्यानुसार, नागरिकांचे मूलभूत अधिकार हा मुद्दा अमेरिकेत महत्त्वपूर्ण मानला जातो. त्याद़ृष्टीने अमेरिकेने पाकिस्तानकडे पाहिले पाहिजे. त्यामुळे पाकिस्तान लष्करावर अंकुश लावण्याची गरज आहे.

Back to top button