दक्षिण आफ्रिकेत सापडली सर्वात जुनी दफनभूमी | पुढारी

दक्षिण आफ्रिकेत सापडली सर्वात जुनी दफनभूमी

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जीवाश्म वैज्ञानिकांनी जगातील आतापर्यंतची सर्वात जुनी दफनभूमी शोधून काढली आहे. त्यांचे म्हणणे आहे की मानवी मृतदेहांना दफन करण्यासाठीची ही सर्वात जुनी ज्ञात जागा आहे. याठिकाणी अत्यंत प्राचीन काळातील छोट्या आकाराचे मेंदू असलेल्या मानवांना दफन करण्यात आले आहे. हे असे मनुष्य होते जे गुंतागुंतीचे व्यवहार करण्यासाठी सक्षम नव्हते. त्यांच्या मेंदूचा आकार आधुनिक मानवाच्या मेंदूच्या केवळ एक तृतियांश इतका होता.

प्रसिद्ध जीवाश्म वैज्ञानिक ली बर्जर यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले. जोहान्सबर्गमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या साईटजवळ त्यांना ही दफनभूमी आढळून आली. होमो नलेदी प्रजातीच्या मानवांची ही दफनभूमी आहे. ही माणसं पाषाणयुगातील होती व झाडावरही चढून जात असत. ही दफनभूमी एका गुहेच्या आत आहे. या गुहेत पाषाणयुगातील मानव राहत होते.

जमिनीखाली शंभर फूट खोलीवर ही दफनभूमी आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती आगामी काळात ‘ईलाईफ’मध्ये प्रकाशित केली जाणार आहे. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीच्या मानवाच्या जीवनावर प्रकाश टाकणारे हे संशोधन आहे. मोठा मेंदू असलेले मानवच दफनभूमीचा विचार करीत होते असे नाही तर छोट्या आकाराचा मेंदू असलेल्या मानवाकडेही ही क्षमता होती.

Back to top button