हत्ती करतो योगासने! | पुढारी

हत्ती करतो योगासने!

वॉशिंग्टन : प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी म्हणजे योगविद्या. शरीर व मनाच्या आरोग्यासाठी योगासने किती उपयुक्त ठरतात हे आता अवघ्या जगालाच कळून चुकलेले आहे. जगभरातील अनेक देशांमधील लोक योगासने करीत असतात. आता तर अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील हत्तीही योगासने करू लागला आहे!

अमेरिकेच्या ह्यूस्टन येथील प्राणीसंग्रहालयात हा 40 वर्षांचा हत्ती आहे. तो अनेक प्रकारची योगासने करून दाखवतो. अगदी पुढच्या दोन पायांवर शरीराचा भारही तोलून दाखवतो. त्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओही समोर आला होता. या प्राणीसंग्रहालयात बारा हत्ती आहेत आणि सर्व हत्ती योगासनांचे धडे घेतात. त्यामध्ये टेस नावाच्या या हत्तीने बरीच प्रगती केली आहे. या हत्तींच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी विशेष लक्ष दिले जात असते.

तेथील क्रिस्टन विंडल यांनी सांगितले की टेस त्यांच्या टीममधील सर्वात चांगल्याप्रकारे विविध योगासने करू शकणारा हत्ती आहे. त्याचे शरीर बरेच लवचिक आहे. हत्ती ज्यावेळी पिल्लू असते त्यावेळीच त्याला असे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाते. हत्तींच्या योगा क्लासचे सेशन तीस सेकंदांपासून 5 मिनिटांपर्यंतचे असते. त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेतली जाते.

Back to top button