जगातील सर्वात गरीब देश बुरूंडी | पुढारी

जगातील सर्वात गरीब देश बुरूंडी

लंडन : जगातील अनेक विकसित व विकसनशील देशांची आपल्याला माहिती असते. लोक बहुतांशी श्रीमंत देशांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा देशांबाबतच आपल्याला कुतुहल वाटत असते. मात्र, जगाच्या पाठीवर अनेक गरीब देशही आहेत. तिथे लोकांना दोन वेळेचे अन्न मिळणेही दुरापास्त होते. जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? बुरूंडी हा जगातील सर्वात गरीब देश आहे. 1996 मध्ये त्याला स्वातंत्र्य मिळाले; परंतु जातीय संघर्षामुळे त्याची अर्थव्यवस्था कोलमडली. येथे सुमारे 1.20 कोटी लोक राहतात; परंतु यापैकी 85 टक्के लोक अत्यंत गरीब आहेत.

जगातील अनेक श्रीमंत देशांबद्दल तुम्हाला माहिती आहे. परंतु, जगातील सर्वात गरीब देशांतील लोक कसे राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? गरिबीची वेदना समजून घेण्यासाठी बुरूंडीतील परिस्थिती पाहावी लागेल. या देशाची लोकसंख्या सुमारे 12 मिलियन म्हणजे 1 कोटी 20 लाख आहे, त्यापैकी 85 टक्के लोक गरिबीत नाही तर घोर दारिद्य्रात जगतात. या देशातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे जग मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेत आहे, त्याचवेळी पृथ्वीवरील या देशात लोकांना जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधा मिळत नाहीत. बुरूंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. एकेकाळी या देशावर ब्रिटन आणि अमेरिकेचे राज्य होते. हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आर्थिक स्थिती चांगली होती; पण 1996 पासून परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. 1996 ते 2005 या काळात बुरूंडीमधील मोठ्या वांशिक संघर्षाने लाखो लोकांचा बळी घेतला आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. हळूहळू हा देश आर्थिकद़ृष्ट्या मागास होत गेला आणि जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला.

बुरूंडीसोबतच मादागास्कर, सोमालिया आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकसह अनेक देश गरिबीचा सामना करत आहेत. या देशातील लोकांचे वार्षिक उत्पन्न 180 डॉलर्स म्हणजे वर्षाला 14 हजार रुपये आहे. येथे दर 3 लोकांपैकी एक बेरोजगार आहे आणि दिवसभर कष्ट करूनही लोकांना दररोज 50 रुपयेही कमावता येत नाहीत. यूएन आणि इतर संस्था जगभरातील अनेक गरीब देशांसाठी अनेक प्रकारच्या मोहिमा चालवतात. असे असूनही बुरूंडीसह जगातील अनेक देशांतील परिस्थिती सुधारलेली नाही.

Back to top button