फ्रीजमध्ये नोटांची बंडले ठेवणारा ‘पराक्रमी’! | पुढारी

फ्रीजमध्ये नोटांची बंडले ठेवणारा ‘पराक्रमी’!

क्वालालंपूर : आपल्याकडे भरपूर पैसे असतील तर आपण काय करू? साहजिकच आहे की, आपण ते एखाद्या उत्तम बँकेत जमा करू. ते नको असेल तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू किंवा शेअर मार्केटसारख्या ज्ञात असलेल्या अन्य स्रोतात वळवू. पण, एखाद्या व्यक्तीकडे इतका अधिक पैसे असेल की तो घरातील फ्रीजमध्ये ठेवावा लागत असेल तर याला काय म्हणावे?

अगदी अलीकडेच मलेशियातील एका स्थानिक गायकाने असा पराक्रम गाजवला असून त्याच्या घरात फ्रीजमध्ये चक्क नोटांच्या बंडला कोंबलेल्या दिसून आल्या. आरिफ बहरन असे या पराक्रमी वीराचे नाव असून त्याने अलीकडेच सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पाहता पाहता तो व्हिडीओ व्हायरल देखील झाला.

या छोट्याशा व्हिडीओ क्लीपमध्ये आरिफने फ्रीज उघडून नोटांचे बंडल दाखवले आणि ते पुन्हा फ्रीजमध्ये आहे तसे ठेवून दिले. पण, हा व्हिडीओ बनवणे आरिफला तितकेच महाग देखील पडले. कारण, त्यानंतर त्याचे सोशल मीडियावर बरेच ट्रोलिंग सुरू झाले. काहींनी लिहिले, प्रथमच पैसे मिळू लागतात, त्यावेळी असे शो ऑफ करावे लागते. एका यूजरने विचारले, तू पैसे खातोस? हा प्रश्न आल्यानंतर आरिफने मौन सोडले आणि तो म्हणाला की, मी ही पैसे बँकेतच ठेवतो. पण, फ्रीजमध्ये ठेवल्याने मला अधिक पैसे मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते!

Back to top button