बीजिंग ः कधी कधी काही चित्रे, आकृत्या, चिन्हे, मिम इतकी व्हायरल होतात की त्यांचा पुढे सर्रास वापरही सुरू होतो. मात्र, मुळातून हे कुठून आले याची अनेकांना माहिती नसते. असाच प्रकार ' लाफिंग मिम ' म्हणून जगभर दिसणार्या चित्राबाबतही आहे. हे चित्र काल्पनिक नसून ते एका चिनी बास्केटबॉलपटूचे आहे. विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून तो आज अब्जाधीश बनलेला असला तरी त्याची ओळख या लाफिंग मिममुळेच अधिक आहे!
या बास्केटबॉलपटूचे नाव आहे याओ मिंग. तो शांघायचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू आहे. खेळातून पैसे कमावल्यानंतर त्याने हा पैसा विविध उद्योग व व्यवसायांमध्ये गुंतवला. आज तो अब्जावधीच्या संपत्तीचा मालक आहे. रेस्टॉरंटपासून ते विविध कंपन्यांपर्यंत त्याने पैसा गुंतवलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तर त्याच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याने दीड दशलक्ष डॉलर्स केवळ रेस्टॉरंट व्यवसायातच गुंतवलेले आहेत. हॉस्टन येथे 'याओ' नावाचे रेस्टॉरंट असून शांघायमध्ये 'यीहा' नावाचे त्याचे रेस्टॉरंट आहे. त्याने समाजोपयोगी कार्यांसाठी बर्याच देणग्याही दिलेल्या आहेत. मात्र, इतके असूनही त्याला 'मीम मटेरियल' म्हणूनच अधिक ओळखले जाते!