ज्वालामुखी अंतराळातून ‘असा’ दिसतो | पुढारी

ज्वालामुखी अंतराळातून ‘असा’ दिसतो

न्यूयॉर्क : अंतराळातून पृथ्वी कशी दिसते किंवा पृथ्वीवरील विविध ठिकाणे कशी दिसतात याचे अनेकांना कुतुहल असते. तत्संबंधी अनेक छायाचित्रे प्रसिद्धही होत असतात. विशेषतः पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर अशी छायाचित्रे टिपून ती प्रसिद्ध करीत असतात. अशाच अंतराळवीरांनी जपानच्या कुरील आयलंडवरील सारीचेव ज्वालामुखीचे छायाचित्र टिपलेले आहे. त्यांनी असे अनेक फोटो काढले असून या फोटोंची एक मालिकाच आहे. हे फोटो सध्याचे नसून ते 2009 मध्ये टिपलेले आहेत.

हा ज्वालामुखी शिखर कुरील आयलंड साखळीतील सर्वात जास्त जागृत समजला जातो. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार या ज्वालामुखीचा हा विस्तृत फोटो ज्वालामुखी तज्ज्ञांना मदत करणारा ठरू शकतो. या फोटोत स्फोट होण्याच्या सुरुवातीचा नेमका काळ कैद झालेला आहे. त्यामध्ये तपकिरी राख आणि पांढरी वाफ दिसून येते. वरच्या बाजूला दिसणारा गुळगुळीत पांढरा भाग हा पाण्याच्या संक्षेपणामुळे म्हणजेच ‘कंडेन्सेशन’ मुळे निर्माण झालेला असू शकतो. त्यामुळे राखेच्या वरील हवेतील भाग हा वेगाने थंड होतो. त्याला ‘पिलियस क्लाऊड’ असे म्हटले जाते. त्याबरोबरच करड्या रंगाचे राखेचे ढगही दिसून येतात. हा ढग ज्वालामुखीच्या तळापासून कळसापर्यंत चढत्या क्रमाने दिसतो.

Back to top button