बुरशी रोगाने मरत आहेत जगभरातील बेडूक | पुढारी

बुरशी रोगाने मरत आहेत जगभरातील बेडूक

न्यू कॅसल : जगातील सर्वात भयानक पशुरोगाने जगभरातील बेडकांचा सध्या मृत्यू होत आहे. हा घातक कवक रोग (बुरशीजन्य रोग) गेल्या 40 वर्षांपासून जगभरातील बेडकांनी संख्या नष्ट करीत आहे. याच कारणामुळे जगातून बेडकांच्या 90 प्रजातींचा सफाया झाला आहे. ही बेडकांमधील एक महाभयानक महामारी आहे.

अलीकडेच ‘ट्रान्सबाऊंड्री अँड इमर्जिंग डिसीज’ या जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एका बहुराष्ट्रीय संशोधनातून आता या आजाराच्या सर्व ज्ञात स्वरूपांचा छडा लावण्यासाठी एक प्रक्रिया विकसित केली आहे. हा आजार ‘अ‍ॅम्फिबियन काइट्रिड फंगस’ या बुरशीमुळे किंवा कवकामुळे होतो. या आजारावरील उपचार शोधण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकते.

‘काइट्रिडिओमाइकोसिस’ किंवा ‘काइट्रिड’मुळे पाचशेपेक्षा अधिक बेडूक प्रजातींच्या संख्येत घट झाली आहे आणि ऑस्ट्रेलियातील सात प्रजातींसह एकूण 90 प्रजाती लुप्त झाल्याचे म्हटले जात आहे. ‘काइट्रिड’ बेडकाच्या त्वचेत संक्रमित होते. हे एकपेशीय कवक बेडकाच्या त्वचेतील पेशीत प्रवेश करते आणि त्याच्या पृष्ठभागावर वाढते. त्वचेच्या या हानीमुळे बेडकांची पाणी आणि मिठाचा स्तर संतुलित करण्याची क्षमता बाधित होते. काइट्रिडची उत्पत्ती आशियात झाली होती. 1980 पासून सातत्याने बेडकांची संख्या यामुळे घटत चालली आहे.

Back to top button