थायलंडमध्ये आहे कमांडोंचे खास ‘हनुमान युनिट’!

हनुमान युनिट
हनुमान युनिट

बँकॉक : रामायणाचा प्रभाव केवळ भारतातच आहे असे नाही. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया अशा आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये तो आजही पाहायला मिळतो. थायलंडमध्ये तर आजही खास 'हनुमान युनिट' नावाची कमांडोंची स्पेशल फोर्स आहे.

जगातील प्रत्येक देशात स्पेशल फोर्सला विशिष्ट नाव देण्याची परंपरा आहे. भारतातही लष्कर, नौदल आणि हवाई दलाने आपापल्या स्पेशल फोर्सना विशिष्ट नावे दिलेली आहेत. भारतात लष्कराचे 'पॅरा स्पेशल फोर्सेज', नौदलाचे 'मार्कोज स्पेशल फोर्सेज' आणि हवाई दलाचे 'गरूड स्पेशल फोर्सेज' आहे. जगाच्या पाठीवर एक असाही देश आहे जिथे स्पेशल फोर्सचे नाव 'हनुमान युनिट' आहे आणि तो देश म्हणजे थायलंड! या स्पेशल फोर्सची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये थायलंड पोलिसांनी 40 अधिकार्‍यांसह केली होती.

थायलंडचे हे स्पेशल फोर्स 'स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स' टीमसारखे काम करते. त्याला अधिकृतपणे 'हनुमान युनिट' असे नाव दिलेले आहे. रामायणातील महापराक्रमी, शूरवीर, बुद्धिमान व बलवान हनुमानाचे नाव या युनिटला दिलेले आहे. हनुमान युनिटची स्थापना थायी पोलिसांच्या क्राईम सप्रेशन डिव्हिजनने जुन्या पोलिस कमांडो युनिटला बदलण्यासाठी केली होती. ते रॅचवॉलॉप रॉयल गार्डस् कमांडच्या अंतर्गत येते.

रॉयल थायी पोलिसांच्या हनुमान युनिटकडे 'एम 4 रायफल', एके-47, स्मिथ अँड वेसन पिस्टल, एफएन फाईव्ह-सेव्हन पिस्टल, हेकलर अँड कोच एमपी 5 सब मशिनगन, एफएन-पी 90 सब मशिनगन यासारखी हत्यारे आहेत. या हनुमान युनिटने ताकेदा आणि ना लूई तातिपसारख्या कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध यशस्वी कारवाई करून आपली ताकद दाखवली आहे. हनुमान युनिटमधील कमांडोंची ट्रेनिंग अत्यंत खडतर असते. त्यांना शारीरिक आणि मानसिकद़ृष्ट्या अत्यंत मजबूत बनावे लागते. प्रत्येक प्रकारचे हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news