युक्रेनच्या सैनिकांचे ‘नाटू नाटू’वर नृत्य! | पुढारी

युक्रेनच्या सैनिकांचे ‘नाटू नाटू’वर नृत्य!

मॉस्को : भारतीय चित्रपटांची मोहिनी जगभरात पाहायला मिळत असते. अगदी राज कपूरच्या ‘आवारा’तील गाण्यांची रशियामध्ये असलेल्या जादूपासून ते ‘थ्री इडियटस्’ची चीनमध्ये असणार्‍या चलतीपर्यंतचा हा इतिहास सांगता येईल. सध्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची अशीच जादू पाहायला मिळत आहे. विशेषतः त्यामधील ‘नाटू नाटू’ गाण्याची. ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर जिंकल्यानंतर एक नवा इतिहास रचला आहे. आता युक्रेनच्या सैनिकांनादेखील ‘नाटू नाटू’ गाण्याचे वेड लागलेलं दिसतंय. सोशल मीडियावर युक्रेनच्या सैनिकांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मूळ गाणे युक्रेनमध्येच चित्रित झाले होते आणि आता युक्रेनी सैनिकांनी बनवलेल्या या गाण्याचे बोल युक्रेनियन भाषेतील आहेत.

या व्हिडीओमध्ये युक्रेनी सैन्यातील दोन सैनिक ‘नाटू नाटू’ या गाण्यावर अभिनेता रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसारखे डान्स करताना दिसत आहे. गाण्यासाठी त्यांनी स्वतःची काही द़ृश्ये तयार केली आहेत. तसेच काही तरुणींसह अन्यही अनेक सैनिक यामध्ये अभिनय व नृत्य करताना दिसतात. व्हिडीओमध्ये युक्रेन सैनिकांचा हा जबरदस्त डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कित्येक सोशल मीडिया यूजरने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.‘नाटू नाटू’ गाणे हे राहुल सिपलीगंज आणि काल भैरवा यांनी एकत्र गायले आहे. या गाण्याचे लिरिकल व्हर्जन 10 नोव्हेंबर 2021 ला प्रसिद्ध केले होते. या गाण्याचा पूर्ण व्हिडीओ 11 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झाला होता. या गाण्याचे तमिळ व्हर्जन, ‘नाटू कोथू’, कन्नडमध्ये ‘हल्ली नाटू’, मल्याळम व्हर्जनमध्ये ‘करिनथोल’ आणि हिंदी व्हर्जन ‘नाचो नाचो’ या नावाने रीलिज करण्यात आले होते. गाण्याच्या व्हिडीओमध्ये चित्रपटातील अभिनेते रामचरण तेजा आणि ज्युनिअर एनटीआर यांनी अफलातून डान्स केला आहे.

गाण्याची कोरिओग्राफी प्रेम रक्षितने केली आहे. रशिया-युक्रेनचे युद्ध सुरू होण्याच्या काही महिने आधीच ‘नाटू-नाटू’ हे गाणे मरिंस्की पॅलेससमोर (युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानासमोर) शूट केले होते. हे गाणे ऑगस्ट 2021 मध्ये चित्रित केले होते. गाण्याचा हूक स्टेप इतका व्हायरल झाला की लोक त्यावर डान्स करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ‘नाटू नाटू’ गाणे रीलिज झाल्यानंतर फक्त 24 तासांमध्ये त्याच्या तेलगू व्हर्जनने 17 लाखांचा आकडा पार केला होता. हे तेलगूमध्ये सर्वात जास्त पाहिले जाणारे गाणे ठरले आहे.

Back to top button