सर्वात मोठे रेल्वे स्टेशन | पुढारी

सर्वात मोठे रेल्वे स्टेशन

न्यूयॉर्क : संपूर्ण जगभर रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. अनेक लहान-मोठी रेल्वे स्टेशन देश-विदेशात पाहायला मिळतात. देशातील सर्वात मोठे रेल्वेस्टेशन प.बंगालमधील हावडा जंक्शन आहे. येथे 26 प्लॅटफॉर्म आहेत; पण तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे? आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत. या रेल्वे स्टेशनचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. या रेल्वे स्टेशनच्या काही गोष्टी पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. हे केवळ एरियाच्या द़ृष्टीनेच नव्हे तर जास्तीत जास्त प्लॅटफॉर्मच्या बाबतीतही जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे.

चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल :

ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे. हे स्टेशन 1903 ते 1913 या काळात बांधण्यात आले होते. हे स्टेशन बांधण्यात आले तेव्हा जड मशिन नसायच्या. हे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागला होता. न्यूयॉर्कच्या या रेल्वे स्टेशनवर एकूण 44 प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजेच येथे एकाच वेळी एकूण 44 गाड्या उभ्या राहू शकतात. या स्टेशनवरून दररोज सरासरी 660 मेट्रो नॉर्थ ट्रेन्स जातात आणि 1,25,000 प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे टर्मिनलमध्ये दोन अंडरग्राऊंड लेवल्स आहेत. येथे 41 ट्रॅक वरच्या स्तरावर आहेत आणि 26 ट्रॅक खालच्या स्तरावर आहेत. हे स्टेशन 48 एकर जागेवर बांधले आहे. या स्टेशनवर एक सीक्रेट प्लॅटफॉर्म देखील आहे. जो वाल्डोर्फ अस्टोरिया हॉटेलच्या अगदी खाली आहे. हे हॉटेल स्टेशनच्या अगदी शेजारी बांधला आहे. राष्ट्राध्यक्ष फँरकलिन रुझवेल्ट व्हीलचेअरच्या साहाय्याने थेट या इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मवर उतरले होते जेणेकरून त्यांना जनतेला आणि माध्यमांना तोंड देणे टाळता येईल. स्टेशनमधून दरवर्षी सुमारे 19 हजार वस्तू हरवतात. त्यापैकी सुमारे 60 टक्के प्रशासनाकडून परत केले जाते.

संबंधित बातम्या
Back to top button