दीड लाख वर्षांपूर्वीच्या मानवाच्या पाऊलखुणा!

जोहान्सबर्ग : एका अद्ययावत डेटिंग मेथडने सर्वात प्राचीन मानवी पाऊलखुणांची माहिती दिली आहे. होमो सेपियन्सपासून आधुनिक मानव विकसित झाला असे मानले जाते. अशा होमो सेपियन मानवाच्या पावलाचा हा ठसा आहे. तब्बल 1,53,000 वर्षांपूर्वी दोन पायांवर चालणार्या मानवाच्या या पाऊलखुणा दक्षिण आफ्रि केत आढळून आल्या आहेत.
गेल्या काही दशकांच्या काळात आफ्रि केत प्राचीन मानवाच्या अशा अनेक पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. त्यामध्ये आता सापडलेला हा पावलाचा ठसा सर्वात जुना आहे. 40 वर्षांपूर्वी टांझानियामध्ये लॅटोली येथे 3.66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मानवाच्या पायाचे ठसे आढळले होते. त्यावेळेपासून आतापर्यंत असे अनेक म्हणजे शंभरपेक्षाही अधिक ठसे शोधण्यात आले आहेत. हे ठसे दगड, राख किंवा चिखलातील आहेत. आता शोधण्यात आलेल्या या पावलाच्या ठशाची माहिती ‘इचनोस’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. संशोधकांनी ‘ओएसएल’ तंत्राचा वापर करून त्याचा काळ शोधला.