ब्रिटनमध्ये मधमाश्यांचे होत आहे अपहरण | पुढारी

ब्रिटनमध्ये मधमाश्यांचे होत आहे अपहरण

लंडन : आजपर्यंत तुम्ही माणसांचं अपहरण झाल्याचं ऐकलं असेलच. कधी परस्पर वैमनस्यातून तर कधी मानवी तस्करीसाठी एखाद्या व्यक्तीचं अपहरण केलं जातं. यामध्ये लहान मुलांच्या अपहरणाची प्रकरणे जास्त समोर येतात; पण आता ब्रिटनमध्ये मधमाश्यांचं अपहरण केलं जात आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलं आहे. या देशात चक्क मधमाश्यांचं अपहरण होत आहे.

2011 पासून येथे 10 लाखांहून अधिक मधमाश्यांचं अपहरण झालं आहे. तसंच सुमारे 135 मधमाश्यांची पोळी चोरीला गेली आहेत. या अपहारांमुळे वर्षानुवर्षे मधमाशी पालन करणार्‍या अशा अनेक शेतकर्‍यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला. मधमाश्या गायब झाल्यामुळे मध तयार होत नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे.

मधमाश्यांच्या अपहरणामुळे अनेकांना मधाचा व्यवसाय बंद करावा लागला. स्किडब्रुक, लिंक्स येथे राहणारे 60 वर्षीय गाए विल्यम्स यांनी सांगितलं की, गेल्या वीस वर्षांत त्यांच्या अनेक राण्यांचं अपहरण करण्यात आलं. राणी मधमाशी गायब होताच बाकीच्या माश्याही नाहीशा होतात. ते म्हणाले की, हे अपहरणकर्ते अतिशय हुशार आहेत. मधमाशी उत्पादनात त्यांच्या अस्तित्वामुळेच मध तयार होतो, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते फक्त राणी मधमाश्यांचं अपहरण करत आहेत. आतापर्यंत या अपहरणकर्त्यांचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. मात्र, अनेक वर्षांपासून तपास सुरू आहे.

Back to top button