पक्ष्यांचा थवा ‘व्ही’ आकारातच का उडतो? | पुढारी

पक्ष्यांचा थवा ‘व्ही’ आकारातच का उडतो?

नवी दिल्ली : पक्ष्यांना आकाशात उडताना पाहणं हा अनेकांचाच आवडता छंद. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की हे पक्षी अनेकदा इंग्रजी ‘व्ही’ आकारातच का उडतात? थोडक्यात पक्षांचा थवा उडताना तुम्ही कधी पाहिला असेल, तर लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ते बरंच अंतर या आकारामध्येच कमालीच्या सुसंगतीने पुढे जातात. इथे कोणालाही कोणाच्याही पुढे निघण्याची घाई नसते; पण तुम्हाला माहितीये का, की हे पक्षी असे नेमके का करतात? जाणून आश्चर्य वाटेल; पण आतापर्यंत या मुद्द्यावर बरीच संशोधनेही झाली असून तज्ज्ञांनी आपआपली मतेही मांडली आहेत.

इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आपल्या आजुबाजूला असणार्‍या प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारणे आहेत. अगदी पक्ष्यांच्या उडतानाच्या संलचनामागेही असेच एक कारण आहे. किंबहुना ही दोन कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे या आकारात उडण्यामुळे पक्ष्यांना या क्रियेत सहजता प्राप्त होते. शिवाय असे केल्यामुळे ते एकमेकांवर आदळतही नाहीत.

असे म्हणतात की पक्ष्यांच्या थव्यामध्ये एक प्रमुख पक्षी असतो. जो उडताना संपूर्ण थव्याला योग्य मार्ग दाखवत असतो. पक्षी जेव्हाजेव्हा थव्याने उडतात तेव्हा तेव्हा हा प्रमुख पक्षी या थव्याच सर्वात पुढे असतो, तर इतर पक्षी त्याच्या मागे एका विशिष्ट रचनेत उडतात. थोडक्यात ज्याप्रमाणे एखादा गटप्रमुख त्यांच्या गटाला मार्गदर्शन करतो अगदी तसेच. इवल्याच्या पक्ष्यांच्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची अशी प्रक्रिया नेमकी किती कमाल आहे हे लंडन विद्यापीठाच्या रॉयल वेटरनरी कॉलेजच्या संशोधनातूनही सिद्ध झाले आहे.

पक्षी जेव्हा थव्यातून उडतात तेव्हा त्यांना हवा कापण्यास मदत होते. शिवाय सोबत उडणार्‍या पक्ष्यांसाठीही ही प्रक्रिया सोपी असते. असे केल्यामुळे त्यांची ताकद व्यर्थ जात नाही, असे निरीक्षण या संशोधनातून समोर आले. थव्यातच राहून, वावरून ते या आकाशात उडण्याची सवय अंगी बाणवून घेतात.

Back to top button