‘सुपरहीरो’ बनण्याच्या नादात मुलाने केला भयंकर प्रकार | पुढारी

‘सुपरहीरो’ बनण्याच्या नादात मुलाने केला भयंकर प्रकार

न्यूयॉर्क : टीव्ही किंवा चित्रपटातील अचाट कृत्ये करणारे सुपरहीरो पाहून मुलांनाही तसे होण्याची इच्छा होत असते. या सुपरहीरोंचे अनुकरण करण्याच्या नादात अनेक मुलं अनेक धोकादायक प्रकार करीत असतात. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. एका मुलाने सुपरहीरो होण्याच्या नादात स्वतःला चक्क पार्‍याचे इंजेक्शन टोचून घेतले!

ही घटना अमेरिकेतील आहे. तिथे पंधरा वर्षांचा एक मुलगा ‘एक्स-मॅन’ मधील सुपरहीरो ‘वुल्वराईन’ने प्रभावित झाला होता. त्याला या सुपरहीरोसारखे बनण्याची तीव्र इच्छा होती. तो दिवसभर त्याच्यासारखाच अभिनय करीत राहायचा. एक दिवस त्याला वाटले की या सुपरहीरोच्या शरीरात मर्क्युरी म्हणजे पारा धातू आहे. त्यामुळेच तो अचाट कृत्ये करू शकतो. यानंतर त्याने स्वतःमध्ये सुपरपॉवर निर्माण करण्याच्या नादात स्वतःला पार्‍याचे इंजेक्शन टोचून घेतले.

हा पारा त्याने थर्मामीटरमधून मिळवला होता. अर्थातच या इंजेक्शननंतर त्याला अतिमानवी शक्ती मिळण्याऐवजी त्याची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्या शरीरात अनेक ठिकाणी अल्सर निर्माण झाले होते जे बरे केले जाऊ शकत नव्हते. डॉक्टरांना हे समजले नाही की त्याने नेमके काय केले आहे. त्यासाठी सायकॉलॉजिस्टची मदत घेण्यात आली. त्यावेळी या मुलाने सांगितले की त्याने स्वतःच जाणुनबुजून पार्‍याचे इंजेक्शन टोचून घेतले आहे. हे सर्व आपण सुपरपॉवर मिळवण्यासाठी केल्याचेही त्याने कबूल केले.

याआधीही त्याने ‘स्पायडरमॅन’सारखे बनण्यासाठी कोळ्याकडून अनेक वेळा दंश करवून घेतला होता! डॉक्टर म्हणाले की त्याला कोणताही मानसिक आजार नाही; पण बालसुलभ वृत्तीमधून असे झाले आहे! सुदैवाने त्याने जे पार्‍याचे इंजेक्शन घेतले होते ते केवळ त्वचेच्या खाली होते. पारा नसांमध्ये पोहोचला असता तर त्याचे रक्त गोठले असते आणि लगेच त्याचा मृत्यू झाला असता. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या एका रिपोर्टमध्ये या केसचा तपशील देण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की त्याच्या शरीरातील अल्सर खास वैज्ञानिक पद्धतीने कापून काढण्यात आले. अनेकवेळा शस्त्रक्रिया केल्यावर आता त्याची स्थिती ठीक आहे.

Back to top button