2700 वर्षांपूर्वीच्या कातडी खोगिराचा चीनमध्ये शोध

बीजिंग : वायव्य चीनमधील एका थडग्यात पुरातत्त्व संशोधकांना तब्बल 2700 वर्षांपूर्वीचे कातडी घोगिर सापडले आहे. हे जगातील सर्वात जुने खोगिर ठरू शकते. हे थडगे एका महिलेचे असून त्यामधील हे घोड्याच्या पाठीवर बसवण्याचे खोगिर इसवी सनपूर्व 700 ते इसवी सन पूर्व 400 वर्षांपूर्वीचे आहे.
चीनच्या झिनजियांग उइगर स्वायत्त प्रदेशातील यांघाई येथील दफनभूमीत हे थडगे आढळून आले होते. त्यामध्ये हे तब्बल 2700 वर्षांपूर्वीचे घोड्याचे खोगिर आढळले. वाळवंटी हवेमुळे ते इतक्या वर्षांनंतरही सुस्थितीत राहिले आहे. ज्या महिलेला याठिकाणी दफन केले होते तिने एक हाईड कोट, लोकरी पायजमा आणि कातडी बूट परिधान केले होते. जणू काही ती या खोगिरावर बसली आहे अशा पद्धतीने हे खोगिर ठेवण्यात आले होते.
‘आर्कियोलॉजिकल रिसर्च इन एशिया’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. या खोगिराची रेडियोकार्बन डेटिंग करण्यात आले. त्यानुसार ते इसवी सनपूर्व 724 ते इसवीसनपूर्व 396 या काळात बनवण्यात आले होते. या खोगिरामध्ये वाळलेले गवत तसेच हरीण व उंटाच्या केसांचा वापर केला आहे.