पाच हजार वर्षांपासून होते सूर्यफुलाची शेती | पुढारी

पाच हजार वर्षांपासून होते सूर्यफुलाची शेती

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुमारे 5 हजार वर्षांपासून सूर्यफुलाची शेती होत आली आहे. भारतात वनस्पती तूप बनवण्यासाठी 1965 मध्ये सूर्यफुलाची शेती सुरू झाली. सतराव्या शतकात रशियाचा सम्राट ‘पीटर द ग्रेट’ने प्रथमच ही फुले नेदरलँडस्मध्ये पाहिली. ती त्याला इतकी आवडली की त्याने सूर्यफुलाची रोपे आपल्या देशातही आणली. युक्रेनमध्ये सध्या सूर्यफुलाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता रशियाबरोबर युद्ध सुरू झाल्यावर त्याला विरोध करण्यासाठी लोक हीच सूर्यफुले हातात घेऊन रस्त्यावर उतरले!

सूर्यफुलात अनेक पोषक घटक आढळतात. त्यामध्ये अँटिऑक्सिडंटस्, प्रोटिन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंकसह अन्यही अनेक घटकांचा समावेश होतो. स्तनाचा कर्करोग, मधुमेह यासारख्या घातक आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यफुलाची बीजे उपयुक्त ठरतात. तसेच जखम लवकर भरून येण्यासाठीही या बिया गुणकारी आहेत. सूज, बद्धकोष्ठता यावरही सूर्यफुलाच्या बियांचे सेवन लाभदायक ठरते. त्वचा, केस यासाठी तसेच हृदय, मेंदू आणि हाडांसाठी सूर्यफुलाच्या बिया गुणकारी आहेत. त्यांचे सेवन सल्ल्यानुसार करणेच गरजेचे असते. याचे कारण म्हणजे या बियांच्या सेवनाने काही लोकांना अस्थमासहीत अन्य काही प्रकारची अ‍ॅलर्जीही होऊ शकते. या बियांच्या सालीमुळे उलटी, पोटदुखी संभवू शकते.

Back to top button