मंगळावरील नदीच्या खोर्‍यातील नमुन्यांवरून जीवसृष्टीचा अभ्यास | पुढारी

मंगळावरील नदीच्या खोर्‍यातील नमुन्यांवरून जीवसृष्टीचा अभ्यास

वॉशिंग्टन : मंगळावर एकेकाळी वाहते पाणी होते हे आता सिद्धच झालेले आहे. एकेकाळी तिथे नद्या वाहत होत्या आणि सरोवरेही होती. सध्याचा मंगळ मात्र कोरडाठाक आहे. मात्र, त्यावर वाहते पाणी होते त्यावेळी तिथे सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टी होती का, याचा अभ्यास केला जात आहे. ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीची काही छायाचित्रे पाठवली आहेत. या छायाचित्रांमध्ये मंगळावर एके काळी प्रचंड वेगाने वाहणार्‍या नद्यांचे मोठे पात्र तसेच मातीचे डोंगर आहेत. हीच छायाचित्रे मंगळावरील जीवसृष्टीचे रहस्य उलगडणार आहेत.

मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी मंगळाच्या पृष्ठभागावरील खडक व मातीचे नमुने ‘नासा’ गोळा करत आहे. ‘नासा’चे पर्सिव्हरन्स हे सध्या मंगळ मोहिमेवर आहे. या रोव्हरने मंगळावरील प्राचीन नदीच्या खोर्‍याचा शोध घेतला आहे. या खोर्‍यातून काही नमुने गोळा करण्यात आले आहेत. या नदीतील खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचे नमुने सापडले आहेत. ही नदी सध्या कोरडी आहे. मात्र, नदीच्या पृष्ठभागावरील मातीचे परीक्षण करून पाण्याचा स्रोत आणि सूक्ष्मजींवाचा अभ्यास केला जाणार आहे.

मंगळ ग्रहावर सापडलेल्या माती आणि दगडाचे नमुने अब्जावधी वर्षांपूर्वी वाहत्या पाण्याद्वारे शेकडो किलोमीटर दूरवरून वाहून आले आहेत. नदीच्या गाळात सापडलेल्या खडकांमध्ये अरोमॅटिक्स नावाचे सेंद्रिय रेणू तसेच चिकणमाती आणि सल्फेट खनिजे आहेत. जेव्हा पाणी खडकाशी संपर्क साधते तेव्हा याप्रकारची जमीन तयार होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यामुळे मंगळ ग्रहावर खरंच जीवसृष्टी अस्तित्वात आहे का, याबाबच खुलासा होण्यास मदत होईल असा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात आहे.

Back to top button