तब्बल 900 किलो वजनाचे ‘बायसन’! | पुढारी

तब्बल 900 किलो वजनाचे ‘बायसन’!

न्यूयॉर्क : आपल्याकडील गव्यांसारखे काही प्राणी आफ्रिकेत आणि अगदी अमेरिकेतही पाहायला मिळतात. मात्र, त्यांच्यामध्ये काही बाबतीत फरक असतो. उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे बायसन. हा प्राणी 6 फूट उंच आणि सुमारे 11 फूट लांबीचा असतो. अशा महाकाय प्राण्याचे वजनही जास्त असणार हे उघड आहे. त्याचे सरासरी वजन 900 किलो असते. मादी बायसनचे वजन आणि उंची थोडी कमी असते.

बायसन हा एक अगडबंब प्राणी आहे; पण म्हणून तो जड, आळशी प्राणी असे नाही. हा प्राणी ताशी 50 कि.मी. वेगाने धावू शकतो. त्याची खास गोष्ट म्हणजे त्याच्या शरीरावर गडद तपकिरी केस असतात. या केसांमुळे त्याचे शरीर पूर्णपणे झाकलेले असते. हनुवटीवर एक प्रकारची दाढी असते. जाड त्वचेमुळे थंडीपासून त्याचा बचाव होण्यास मदत होते.

अमेरिका आणि कॅनडासारख्या भागात तापमान शून्याच्या खाली जाते आणि बायसनला त्याच्या अंगावरील दाट केसांमुळे ऊब मिळते. त्यांना राग आला तर ते हिंस्र प्राण्यांशीही झुंज देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढण्यात हा प्राणी पटाईत आहे. या प्राण्याची शेपूट उभी दिसली तर समजा हल्ला होणार आहे! बायसन विरुद्ध बायसन ही लढाई देखील अनेक वेळा पाहायला मिळत असते. अमेरिकेतील रस्त्यावर देखील ते अनेकदा झगडताना दिसतात.

Back to top button