वार्‍याने आकाशात उडाला सोफा! | पुढारी

वार्‍याने आकाशात उडाला सोफा!

इस्तंबुल : निसर्गाच्या शक्तीपुढे मानवी शक्ती, वस्तू अक्षरशः पालापाचोळ्याप्रमाणेच आहेत. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये निसर्गाचा असा रुद्रावतार समोर येत असतो. तुर्कीमध्ये राजधानी अंकारा येथे आलेल्या अशाच वादळाचा तडाखा बसला आहे. या वादळात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे जी पाहून लोकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुर्कीमध्ये आलेले वादळ किती भयानक होते याची झलक या व्हिडीओमध्ये दिसत आहे. वादळी वार्‍याने एका घरातील सोफा चक्क हवेत उडाला आणि आकाशात गेला!

अंकारामधील वादळाच्या व्हिडीओमध्ये एका इमारतीबाहेर सोफाही आकाशात उडताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक वस्तू उडताना दिसत आहे जेव्हा कॅमेरा झूम केला जातो तेव्हा समजते की ती वस्तू एक सोफा आहे. वादळी वार्‍याच्या तडाख्यात सापडलेला हा सोफा इमारतीच्या बाहेर आकाशात उडताना दिसत आहे आणि दुसर्‍या इमारतीवर जाऊन आदळतो.

या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाल्याबाबत खात्रीपूर्वक माहिती उपलब्ध नाही. एका यूजरने सांगितले की, कल्पनी तुम्ही खिडकीच्या बाहेर पाहता आणि एक सोफा तुमच्या दिशेने उडत येत आहे “दुसर्‍याने लिहिले, ‘हे फक्त तुर्कीमध्ये घडू शकते हाहाहा.”तिसर्‍या एका व्यक्तीने तर असेही म्हटले की, ‘मला त्या सोफ्यावर बसायला आवडेल आणि मी पुन्हा कधीही तो जमिनीवर उतरवणार नाही.’ 17 मे रोजी अंकारा येथे एका वादळाने हाहाकार पसरवला असून शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

Back to top button