नवी दिल्ली : सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात कोणत्या वस्तूला कसा भाव येईल हे काही सांगता येत नाही. हल्ली शेणाच्या गोवर्याही इंटरनेटवर विकल्या जाऊ लागल्या आहेत. अशा देशी वस्तूंना दिलेली इंग्रजी नावे वाचली की एखाद्याला भोवळ येऊ शकते! सध्याच्या ई-कॉमर्स वेबसाईटस्च्या जमान्यात, ऑनलाईन खरेदीची हौस असलेल्या लोकांमुळे अनेक प्रकारच्या वस्तूंची विक्री होत असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा असतात. आता एका अमेरिकन ई-कॉमर्स वेबसाईटवर बाजलं किंवा चारपायीची विक्री सुरू आहे. तिथे अशा बाजल्याची किंमत तब्बल 1 लाख 12 हजार रुपये सांगण्यात आली आहे!
या बाजल्याचे वर्णन 'ट्रडिशनल इंडियन बेड विथ ब्युटिफूल डेकॉर' असे केलेले आहे. हाताने बनवलेले हे बाजलं खरोखरच सुरेख आहे; पण त्याची किंमत वाचून अनेकांना धक्का बसला. अर्थात अमेरिकेत भारतीय हस्तकलेच्या वस्तूंना मोठी किंमत मिळतच असते, त्यामध्ये नावीन्य असे काही नाही. मात्र, या बाजल्याची किंमत पाहून ते आता इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे.
भारतात अनेकांनी बाजल्याकडे पाठ वळवली असली तरी सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेत त्याला लाखोंची किंमत मिळत आहे हे पाहून अनेकांनी समाधानही व्यक्त केले आहे. अमेरिकेत अशा वस्तूंना मोठी किंमत मिळणे ही नवी बाब नाही. यापूर्वी भारतात ज्या कडुनिंबाच्या दातुनला पाच रुपयांची किंमत मिळते ते अमेरिकेत दोन हजार रुपयांना विकले जात होते!