मर्सिडीजपेक्षाही महाग 60 वर्षांपूर्वीचे घड्याळ! | पुढारी

मर्सिडीजपेक्षाही महाग 60 वर्षांपूर्वीचे घड्याळ!

लंडन : जुन्या वस्तू भंगारात टाकल्याशिवाय काही लोकांचे समाधानच होत नाही. पण, अशा जुन्या, पुरातन वस्तू टाकून देत असतानाही हजार वेळा विचार करावा लागेल, याची प्रचिती देणारा घड्याळाचा लिलाव अलीकडेच झाला आहे. ही घटना ब्रिटनमधील असून आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने 60 वर्षांपूर्वी त्यांनी खरेदी केलेल्या घड्याळाचा लिलाव केला आणि या लिलावातून मिळालेली रक्कम इतकी आहे की, त्यातून आलिशान मर्सिडीज कारदेखील सहज विकत घेता येऊ शकेल.

टीडब्ल्यू गेझच्या मार्फत हा लिलाव पार पडला. ब्रिटनमधील रॉयल नेव्हीचे सर्च-रेस्क्यू ड्रायव्हर सायमन बर्नेटने हे घड्याळ खरेदी केले होते. 2019 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा पीटर बर्नेटला सदर घड्याळ 1963 मधील असल्याचे लक्षात आले. 60 वर्षांपूर्वी सायमन यांनी 70 पौंड म्हणजे आजच्या हिशेबाने सुमारे 7 हजार रुपये खर्च केले होते. येथे लिलावात मात्र या घड्याळाला तब्बल 41 लाख रुपये अशी भरभक्कम बोली मिळाली.

पीटर बर्नेट यावेळी म्हणाला की, हे घड्याळ वडिलांची आठवण असल्याने ते विकण्याचा निर्णय कठीण होता. पण, आता मला माझा निर्णय योग्य होता, असे वाटत आहे. माझे वडील सिंगापूरला असताना त्यांनी हे घड्याळ विकत घेतले होते. त्यांच्या हयातीनंतर मी काही दिवस हे घड्याळ घालत असे. पण, 60 हजार पौंडांचे घड्याळ घालून फिरणे मला सुरक्षित वाटत नव्हते.

माध्यमातून आलेल्या वृत्तानुसार, सदर लिलाव ऑनलाईन झाला आणि हे घड्याळ खरेदी करणार्‍या व्यक्तीने आपला तपशील जाहीर केलेला नाही. 1963 मधील रोलेक्स सबमरीनर घड्याळ केवळ स्टेटस सिम्बॉल अजिबात नव्हते. कारण, सायमन हे त्यावेळी समुद्रातील रेस्क्यू मिशनवर जात असतानाही ते घड्याळ घालत असत. आपण किती वेळ पाण्याखाली राहिलो, याची माहिती घेण्यासाठी ते हे घड्याळ घालायचे. आता मात्र हे घड्याळ जणू स्टेटस सिम्बॉल झाले आहे.

Back to top button