

कॅलिफोर्निया : डेथ व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅलिफोर्नियातील या वाळवंटी खोर्यातील तापमान आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. कॅनडातील हीट डोमने हाहाकार माजविला असतानाच दुसरीकडे अमेरिकेतील 'डेथ व्हॅली'ही आपल्या नावारूपास साजेशी वर्तन करू लागली आहे. आताच या भागातील पारा 130 अंश फॅरेनाईटवर (54.4 अंश सेल्सिअस) पोहोचला होता.
या भागातील सर्वाधिक तापमानाच्या विक्रमाचा विचार करावयाचा झाल्यास 9 जून 1913 रोजी 134 अंश फॅरेनाईट इतक्या तापमानाची नोंद झाली होती. या विक्रमी तापमानापेक्षा सध्याचे तापमान अवघ्या 4 अंशांनी कमी आहे. 1913 मधील तापमान हे आजपर्यंतचे विक्रमी ठरले आहे.
सध्या अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील उष्णतेच्या लाटेचे संकट अद्याप टळलेले नाही. यामुळे सुमारे 108 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय कॅलिफोर्नियातील जंगलातही आग धुमसतच आहे.
दरम्यान, डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर येत्या काही दिवसांत तापमान 117 अंशांवर पोहोचू शकते. अमेरिकेत मागचा जून महिना हा आजपर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला होता. उष्णतेच्या लाटेमुळे 26 जून ते 1 जुलै या कालावधीत ऑरिगनमध्ये 116 तर वॉशिंग्टनमध्ये 78 लोकांचा मृत्यू झाला आहे.
डेथ व्हॅली ही समुद्राच्या पातळीपेक्षा 300 मीटरने खाली आहे. या ठिकाणी झाडे-झुडपे अथवा लोक राहात नाहीत. येथील उष्णता बाहेर न जाता ती तिथेच वाढतच आहे. यामुळेच नवा विक्रम स्थापित करण्याची शक्यता आहे.