२०४० पर्यंत ‘जेनी’ करणार महासागरांना प्लास्टिक मुक्त | पुढारी

२०४० पर्यंत ‘जेनी’ करणार महासागरांना प्लास्टिक मुक्त

नवी दिल्ली : सध्या प्लास्टिक हे मानवी जीवनाचा एक भागच बनले आहे. मात्र, हेच प्लास्टिक पर्यावरणाच्या र्‍हासाचे प्रमुख कारण ठरू लागले आहे. महासागर, नदी व अन्य जलाशयांत दरवर्षी लाखो टन प्लास्टिक मिसळत आहे. यामुळे जलचरांना मोठा धोका निर्माण होत आहे. हाच धोका समूळ नष्ट करण्यासाठी एका संस्थेने पुढाकार घेतला आहे.

दशकभरापूर्वी 18 वर्षीय बोयन स्लॅट या युवकाने आपल्याकडे महासागरांना प्लास्टिकमुक्त करण्याची योजना असल्याचे सांगितले होते. स्लॅट आता 27 वर्षांचा असून, तो महासागरांना प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने ‘ओशियन क्लिनअप’ नावाची गैरसरकारी संस्थेची स्थापना केली आहे. 2040 पर्यंत महासागरांमध्ये तरंगणारे सुमारे 90 टक्के प्लास्टिक हटविण्याचे या संस्थेचे लक्ष्य आहे.

स्लॅटची ही घोषणा अजब वाटत असली तरी सध्या तो प्लास्टिकचा कजरा  हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. ओशियन क्लिनअप नामक मोहिमेंतर्गत स्लॅटने 2018 मध्ये एक मशिन लाँच केली. मात्र, याचे प्रोटोटाईप तुटले. त्यानंतर 2019 मध्ये दुसरे उपकरण तयार केले. हे उपकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने महासागरातील तरंगणारे प्लास्टिकगोळा करू लागले आहे.

असेच आणखी एक सुधारित उपकरण तयार करण्यात आले असून, त्याला जेनी असे नाव देण्यात आले आहे. हे उपकरण आपल्या विशाल जाळ्यांच्या मदतीने एकावेळी तब्बल 9 टन तरंगणारे प्लास्टिकगोळा करते. यामुळे प्लास्टिक कमी होणार आहे.

Back to top button