कोलोरेक्टल कॅन्सर वाढतोय शुगर ड्रिंक्सने | पुढारी

कोलोरेक्टल कॅन्सर वाढतोय शुगर ड्रिंक्सने

नवी दिल्ली :  कोलोरेक्टल कॅन्सर हा शुगर ड्रिंक्सच्या सेवनाने वाढतो हे नव्या संशोधनाने समोर आले आहे. मधुमेह असलेल्या लोकांसाठी साखरयुक्त आणि गोड पदार्थ धोकादायक ठरू शकतात, हे सर्वांनांच माहीत आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील दाव्यानुसार शुगर ड्रिंक्समुळे किशोरवयीन, युवा आणि वयस्क लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वेगाने वाढत आहे. आतड्याचा व मलाशयाचा कॅन्सर एकाचवेळी होतो, त्याला ‘कोलोरेक्टल कॅन्सर’ असे म्हटले जाते.

विशेषज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर ची बाधा होणार्‍या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ‘मेडिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात शुगर ड्रिंक आणि कोलोरक्टल कॅन्सरमध्ये असलेल्या संबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधनात सुमारे 94,464 नर्सेसना सहभागी करवून घेण्यात आले होते. यापैकी सुमारे 41,272 नर्सेसच्या शारीरिक समस्यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. ज्यांनी वयाच्या 13 ते 18 वर्षांपर्यंतचे साखरयुक्त आणि गोड पदार्थांच्या सेवनाचे रेकॉर्ड ठेवले होत. या गोड पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शुगर टी, सफरचंद, संत्री, द्राक्षे यांसारख्या गोड पदार्थांच्या ज्यूसचाही समावेश होता.

संशोधनातील माहितीनुसार 24 वर्षांच्या फॉलोअपनंतर संशोधकांना सुमारे 109 नर्सेसना कोलोरेक्टल कॅन्सरची बाधा झाल्याचे आढळून आले. संशोधनात असेही आढळून आले की, ज्या महिला आठवड्यात एकच शुगरयुक्त ड्रिंक घेत होत्या, त्यांच्या तुलनेत आठवड्यात दोन किंवा अधिकवेळा साखरयुक्त घेणार्‍या महिलांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button