‘तिच्या’ पोटात होता चक्क सुई-धागा! | पुढारी

‘तिच्या’ पोटात होता चक्क सुई-धागा!

लंडन : अनेक लोकांच्या पोटात काय काय जाईल हे काही सांगता येत नाही. देश-विदेशात अशी अनेक माणसं दिसून आली ज्यांच्या पोटातून भलत्यासलत्या वस्तू बाहेर काढल्या. आता असाच एक प्रकार कोलंबियामध्ये घडला आहे. तिथे 39 वर्षांच्या एका महिलेच्या पोटात चक्क सुई-धागा असल्याचे आढळून आले. अर्थात हा सुई-धागा तिने गिळला नव्हता तर शस्त्रक्रिया करीत असताना तो तिच्या पोटात राहून गेला होता.

या महिलेचे नाव आहे एडेरलिंडा फोरेरो. चार मुलांना जन्म दिल्यावर तिने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर तिला अनेक वर्षे पोटदुखीचा त्रास होत होता. डॉक्टरांकडे गेल्यावर ते तिला पेनकिलरच्या गोळ्या देत असत. अशी अकरा वर्षे निघून गेली. तिचे पोट इतके दुखत असे की ती रात्रभर झोपूही शकत नसे. एका खेड्यात राहत असल्याने व दवाखाना दूर असल्याने ती मुकाट्याने हा त्रास सहन करी. शेवटी तिने एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली तक्रार सांगितली.

त्यावेळी डॉक्टरांनी तिला अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय स्कॅन करण्यास सांगितले. ज्यावेळी रिपोर्टमध्ये आढळले की तिच्या पोटात सुई-धागा आहे त्यावेळी डॉक्टरही चकीत झाले. तिच्यावरील शस्त्रक्रियेवेळी हा सुई-धागा डॉक्टरांच्या गाफिलपणाने राहून गेला होता. या चुकीची किंमत तिला अकरा वर्षे असह्य वेदना सहन करून चुकवावी लागली!

Back to top button