Moon : चंद्राच्या पोटात काय आहे? | पुढारी

Moon : चंद्राच्या पोटात काय आहे?

न्यूयॉर्क : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. पृथ्वीशिवाय केवळ चंद्रावरच माणसाचे पाऊल पडलेले आहे. चंद्राबाबत नेहमीच नवे नवे संशोधन होत असते. पृथ्वीच्या कोअरप्रमाणे चंद्राच्या गाभ्याबाबतही संशोधकांना कुतूहल आहे. आता संशोधकांनी चंद्राच्या कोअरबाबत एक नवे संशोधन केले आहे. चंद्राच्या कोअरमध्ये लोखंडासारख्या घनत्वाचा एक ठोस गोळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फ्रान्समधील फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे खगोलशास्त्रज्ञ आर्थर ब्रियाड यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन झाले. त्यांनी सांगितले की, या संशोधनामुळे चंद्राचे चुंबकीय क्षेत्र आणि सुरुवातीच्या काळातील सौरमंडळाविषयी अधिक माहिती मिळू शकते. सीसमिक (भूकंपीय) डेटा सौरमंडळातील वस्तूंच्या आंतरिक संरचनेच्या प्रभावाची तपासणी करतो. भूकंपामुळे ज्या प्रकारच्या लहरी बनतात, त्यापासून वैज्ञानिकांना त्याच्या अंतर्गत भागाचा नकाशा बनवण्यास मदत मिळू शकते. ब्रियॉड यांनी सांगितले, आमच्याकडे अपोलो मोहिमेतून गोळा केलेला भूकंपीय डेटा आहे,

मात्र आंतरिक कोअरच्या स्थितीला अचूकपणे निर्धारित करण्यासाठी त्याचे रिझोल्यूशन अतिशय कमी आहे. आम्हाला ठाऊक आहे की, एक द्रव हा बाह्य कोअर आहे. मात्र त्यामध्ये काय काय आहे याबाबत मतभेद आहेत. अपोलो डेटाशी एक ठोस आंतरिक आणि एक पूर्णपणे द्रवरूप कोअरची माहिती मिळतीजुळती आहे. अंतराळ मोहिमा आणि लेसर रेंजिंग प्रयोगांच्या सहाय्याने चंद्राबाबतचा डेटा एकत्र करण्यात आला. कोणता डेटा सर्वाधिक मेळ खाणारा आहे हे पाहण्यासाठी अनेक प्रकारचे मॉडेलही बनवण्यात आले. त्यामधून अनेक प्रकारची माहिती मिळाली.

Back to top button