अंतराळातून घडले ‘आय ऑफ सहारा’चे दर्शन

पॅरिसः संयुक्त अरब अमिरातचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधून टिपलेली ‘आय ऑफ द सहारा’ची काही अनोखी, दुर्मीळ छायाचित्रे आपल्या टि्वटर अकाऊंटवर पोस्ट केली असून याचा सोशल मीडियावर बराच बोलबाला राहिला. सुलतान अल नेयादी तब्बल सहा महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर असून त्यांनी उत्तर पश्चिमी मॉरिटानियाची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत.
स्पेस सेंटरमधून टिपलेली छायाचित्रे पोस्ट करताना नेयादी म्हणाले की, ‘मी टिपलेली ही काही दुर्मीळ छायाचित्रे भूवैज्ञानिक आश्चर्याचे प्रतिबिंब आहेत. याला ‘द रिचट स्ट्रक्चर’ असेही संबोधले जाते. अशी छायाचित्रे आपल्याला आपल्या ग्रहांची अविश्वसनीय सुंदरता आणि रहस्यांची आठवण करून देतात, जे अद्याप आपल्याला शोधायचे आहेत’.
अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी जी छायाचित्रे पाठवली, त्या ‘आय ऑफ सहारा’च्या संरचनेला भूवैज्ञानिक शिखर असे मानतात. याचे वरील स्तर हवा व पाण्यामुळे नष्ट झालेले आहेत. हे जमिनीवरून पाहणे निव्वळ अशक्य आहे. मात्र, अंतराळातून त्याचे स्पष्टपणे दर्शन होते.
युएईचे सुलतान अल नेयादी हे अंतराळ मोहिमेवर गेलेले पहिले अरेबियन अंतराळवीर आहेत. आय ऑफ सहारापूर्वी त्यांनी प्रकाशात झगमगलेल्या दुबईची काही छायाचित्रे टिपली होती.