तेव्हा टपालाने पाठवायचे हिरे, विटा अन् बालके!

तेव्हा टपालाने पाठवायचे हिरे, विटा अन् बालके!

न्यूयॉर्क : टपाल सेवा सुरू झाली, त्यावेळी पत्राबरोबरच अनेक वस्तू पाठवणे सहज शक्य झाले. पण, जुना इतिहास नजरेखालून पाहिला तर असेही लक्षात येईल की, साधारणपणे 100-200 वर्षांपूर्वी अशा वस्तू पाठवल्या गेल्या आहेत की, आज त्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे.

टपालाने पाठवल्या गेलेल्या सर्वात मौल्यवान वस्तूंमध्ये होम डायमंडचा आवर्जून समावेश होतो. चार शतकांहून जुन्या असलेल्या या निळ्या हिर्‍याला समृद्ध इतिहास आहे. कित्येक राजे, राणी, शाही मालक, चोर आणि रत्नपारखींकडून हाताळला गेलेला हा हिरा 1958 मध्ये न्यूयॉर्कमधील व्यापारी हॅरी विन्स्टन यांच्याकडे पोहोचला. काही वेळा प्रदर्शन भरवल्यानंतर त्यांनी हा हिरा राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्द केला. पण, आश्चर्य म्हणजे त्यांनी हा हिरा तपकिरी रंगाच्या साध्या कागदात लपेटून पोस्टाने पाठवला. यासाठी त्यांना 2.44 डॉलर्स खर्च आला, याचा 132 डॉलर्सचा विमा उतरवला आणि तो हिरा सुरक्षितपणे संग्रहालयाकडे पोहोचला देखील!

असाच भन्नाट किस्सा आहे मुलांना टपालाने पाठवण्याचा. 1913 मध्ये अमेरिकेत पार्सल सेवा सुरू झाली, त्यावेळी मुलांचे तिकीट काढून त्यांना घेऊन जाण्याऐवजी त्यांना मेलने पाठवणे अधिक स्वस्त आहे आणि ओहियो येथील मिस्टर अँड मिसेस जेसी ब्यूज या महाभागांनी आपल्या मुलाला आपल्या आजीच्या घरी टपालाने पाठवले. यासाठी त्यांना खर्च आला केवळ 15 सेंट!

त्यानंतरही अशा तर्‍हेने मुलांना टपालाने पाठवले जायचेच. पण, एकदा एका छोट्या मुलीला 100 किलोमीटर्सपेक्षा अधिक अंतरात पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आणि हा सारा प्रकारच बंद करण्यात आला.

1916 मध्ये तर आणखी कहर झाला, ज्यावेळी चक्क 80 हजार विटा टपालाने पाठवण्यात आल्या. त्यावेळी अवजड वस्तू पाठवण्यावर बंदी नव्हती. पण, अशी भन्नाट कृती कोणी करेल, याचा डाक सेवा संचालकांनीही त्यावेळी विचार केला नसेल. विल्यम एच. कोलथार्प या महाभागाने त्यावेळी चक्क 80 हजार विटा 200 किलोमीटर अंतरावर पाठवल्या आणि या विटांच्या माध्यमातून बँकेची इमारत सुसज्ज उभी केली. ऐकावे ते नवल म्हणतात ते यालाच कदाचित!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news