5 दिवस जंगलात अडकली अन् वाईन पिऊन तगली!

व्हिक्टोरियाःपूर्वी लोक म्हणायचे की, कुठे जात असाल तर काही तरी घेऊन जा. न जाणो ते कसे, केव्हा उपयोगाला येईल! ऑस्ट्रेलियातील लिलियन या 48 वर्षीय महिलेला जणू ही शिकवणच पुनर्जन्म बहाल करून गेली. झाले असे की, ही महिला फिरण्यासाठी बाहेर पडली, पण रस्ता चुकला आणि ती एका घनदाट जंगलात अडकली. जंगलात ना नेटवर्क चालत होते, ना तिला बाहेर पडण्याचा रस्ता सापडत होता. एक दोन नव्हे तर चक्क 5 दिवस ती जंगलात हिंस्र श्वापदाची भीती बाळगत रस्ता शोधत राहिली. नंतर गस्तीवरील पोलिसांच्या नजरेला ही महिला आली आणि त्यांनी तिला सुरक्षितपणे जंगलातून बाहेर काढले, पण या 5 दिवसांत तिने गुजराण कशी केली, ते अधिक रंजक आहे. कारण, ती जंगलात हरवली त्यावेळी तिच्या कारमध्ये फक्त वाईनची एक बाटली आणि लॉलीपॉप इतकेच होेते आणि यावरच तिने हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ निभावून नेला!
न्यूयॉर्क पोस्टमधील रिपोर्टनुसार, 48 वर्षीय लिलियन ही ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियास्थित हाय कंट्री येथे फिरण्यासाठी कारने निघाली होती. या प्रवासादरम्यान घनदाट जंगल लागते. हे जंगल पार करत असताना लिलियनची कार यांकी पॉईंट ट्रँकजवळ एका बाजूला आदळली आणि रस्त्यावरून बाजूला फेकली गेली. त्यानंतर तिने कारवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, यात तिची कार चिखलात अडकली.
घनदाट जंगलात मोबाईल नेटवर्क येण्याचा प्रश्नच नव्हता. कार झाडीत अडकल्याने कोणाला कार दिसण्याचाही प्रश्न नव्हता. दरम्यान, लिलियन पुढील दिवशीही घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि चौकशी सुरू केली गेली. ती ज्या मार्गाने जाणार होती, त्या मार्गावरील जंगलाचा कोपरा न कोपरा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून धुंडाळला गेला. 5 दिवसांनंतर पोलिसांना बुशलँडजवळ झाडाझुडपात तिची कार आढळून आली आणि या कारनजीकच ती महिला हातवारे करताना दिसून आली. व्हिक्टोरिया पोलिसांनी यावेळी सांगितले की, लिलियन पाच दिवस फक्त वाईन पिऊन, काही लॉलिपॉप खाऊन जिवंत राहिली. आश्चर्य म्हणजे त्यापूर्वी तिने कधी वाईनला हातही लावला नव्हता!