गोड्या पाण्यातील सर्वात मोठी कासव प्रजाती होणार नष्ट | पुढारी

गोड्या पाण्यातील सर्वात मोठी कासव प्रजाती होणार नष्ट

बीजिंग : ‘यांगत्झी जायंट सॉफ्टशेल टर्टल’ ही मऊ कवचाच्या कासवांची एक प्रजाती आहे. ही जगातील सर्वात मोठी गोड्या पाण्यातील कासव प्रजाती असल्याचे मानले जाते. ‘रॅफेटस् स्विनहोई’ असे तिचे नाव. आता या प्रजातीमधील अखेरच्या मादी कासवाच्या मृत्यूमुळे ही प्रजाती जणू नष्टच झाली आहे. केवळ दोन नर कासवे उरली असल्याने या प्रजातीची पुढे वंशवृद्धी होण्याची शक्यता मावळली आहे. मादी जिवंत राहिली असती तर तिने वर्षाला शंभर किंवा त्यापेक्षाही अधिक अंडी दिली असती व त्यामधून अनेक पिल्लांचा जन्म झाला असता. मात्र, व्हिएतनाममध्ये ती मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे.

ही मादी पाच फूट लांबीची आणि 93 किलो वजनाची होती. 21 एप्रिल रोजी ती मृतावस्थेत आढळल्याचे आता जाहीर करण्यात आले आहे. हनोईच्या सोन ताय जिल्ह्यातील डोंग मो नावाच्या सरोवराच्या काठी तिचा मृतदेह 21 एप्रिलला वाहून आला. तत्पूर्वी, अनेक दिवस आधी ती मृत झाली असावी असा अंदाज आहे. ऑक्टोबर 2020 मध्येच तिचा शोध लागला होता.

तत्पूर्वी, या प्रजातीची अन्य मादी आढळून आली नव्हती. चीनच्या सुझू प्राणीसंग्रहालयात एका मादीमध्ये कृत्रिमरीत्या प्रजनन घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता व ही मादी एप्रिल 2019 मध्ये मृत्युमुखी पडली होती. आता याच सुझू प्राणीसंग्रहालयात या प्रजातीचा एक नर असून दुसरा नर व्हिएतनामच्या डोंग मो लेकमध्ये आहे.

Back to top button