चक्क बेडूकही करतो परागीकरण | पुढारी

चक्क बेडूकही करतो परागीकरण

रिओ डी जनैरो : फुलपाखरे, भुंगे यासारखे कीटक फुलांमधील परागीकरणास मदत करीत असतात याची आपल्याला माहिती आहे. हे कीटक फुलांवर बसले की त्यांच्या पायांना फुलातील परागकण चिकटतात व नंतर ते अन्य फुलांमध्ये जाऊन परागीकरण होऊन फळधारणेस मदत होते. हे कार्य उभयचर प्राण्यांकडूनही घडत असेल याची आपण कल्पना केली नव्हती. मात्र, झाडांवर राहणार्‍या ब्राझिलियन बेडकांकडून हे कार्य घडत असते. परागीकरण करणारे ते पहिलेच उभयचर प्राणी ठरले आहेत.

बेडकांचा आहार हा कीटकांचा असतो; पण कीटकांचा जो आहार असतो तोच आता हे बेडूक घेत आहेत. ब्राझीलमधील या बेडकांची पोषणाची स्वतःची एक वेगळी पद्धत आहे. ते फुलांच्या नलिकेत तोंड खुपसून त्यामधील गोड मधुरस ओढून घेतात. त्यावेळी त्यांच्या शरीराला एका फुलातील परागकण चिकटतात व बेडूक अन्य फुलाकडे गेला की तिथे त्यांचे सिंचन होते. अशाप्रकारे हे बेडूक फुला-फुलांवर जात असताना नकळतपणे परागीकरणही घडवून आणतात.

उभयचर प्राण्यांकडून फुलझाडांचे परागीकरण घडण्याचे हे पहिलेच उदाहरण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘फूड वेब्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ब्राझीलच्या माटो ग्रोस्सो डो सुल येथील फेडरल युनिव्हर्सिटीतील संशोधक विद्यार्थी कार्लोस हेनरीक डी-ऑलिव्हिरिया-नोगैरा यांनी याबाबतची माहिती दिली. मोठ्या फुलामध्ये जाणार्‍या आणि फुलाची रचना न बिघडवता अंगभर परागकण माखून घेणार्‍या बेडकांना आम्ही पाहिले आहे. अशा प्रकारच्या वर्तनाची प्रथमच नोंद घेण्यात आली आहे.

Back to top button