तामिळनाडूत दिसला सफेद नाग! | पुढारी

तामिळनाडूत दिसला सफेद नाग!

चेन्नई : निसर्गात सफेद म्हणजेच ‘अल्बिनो’ पशु-पक्षी अनेक आहेत. त्यामध्ये अगदी मगर, कासव, वाघ-सिंह यांच्यापासून ते मोर, डॉल्फिन आणि व्हेलपर्यंतच्या अनेक जीवांचा समावेश होतो. शरीरातील रंगद्रव्ये म्हणजेच मेलनिन पिग्मेंटस्च्या अभावी काही प्राण्यांचा रंग असा सफेद होत असतो. आता तामिळनाडूत कोईम्बतूर येथे असाच सफेद नाग दिसून आला. त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
कुरिची येथील रहिवाशांना हा फणा काढलेल्या पांढर्‍या शुभ्र नागाचे दर्शन होताच त्यांनी त्याची माहिती वन विभागाला दिली. याबाबत समजताच वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन या सफेद नागाला पकडले व त्याला जंगलातील त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. त्याचा एक व्हिडीओही आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पूर्ण वाढ झालेला हा सफेद नाग अत्यंत देखणा दिसत होता. त्याला जंगलात सोडत असताना फणा काढूनच तो झाडीत सळसळत गेला. त्याचा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले.

Back to top button