अंतराळातून टिपला वाळवंटातील ‘डोळा’! | पुढारी

अंतराळातून टिपला वाळवंटातील ‘डोळा’!

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून पृथ्वीची अनेक सुंदर छायाचित्रे टिपली जात असतात. आता संयुक्त अरब अमिरातीचा अंतराळवीर सुल्तान अल नेयादी याने अंतराळ स्थानकामधून ‘आय ऑफ द सहारा’ म्हणजेच ‘सहारा वाळवंटाचा डोळा’ असे संबोधल्या जाणार्‍या भूरचनेची छायाचित्रे टिपून ती सोशल मीडियात शेअर केली आहेत.

यूएईचा हा अंतराळवीर सहा महिन्यांसाठी अंतराळ स्थानकावर गेला आहे. त्याने वायव्य मॉरिटानियाची छायाचित्रे शेअर केली आहेत. ट्विटरवर त्याने लिहिले आहे की ‘आयएसएस’मधून ‘आय ऑफ सहारा’ची ही छायाचित्रे मी कॅमेर्‍यात टिपून घेतली. हा ‘डोळा’ म्हणजे एक भूवैज्ञानिक आश्चर्य आहे. त्याला ‘द रिचट स्ट्रक्चर’ असे म्हटले जाते.

पृथ्वीवरील अनेक अनोख्या आणि रहस्यमय ठिकाणांपैकी हे एक आहे. भूवैज्ञानिक या रचनेला जियॉलॉजिकल घुमट मानतात. त्याचे वरील भागातील स्तर हवा आणि पाण्यामुळे नष्ट झाले आहेत. त्यांना जमिनीवरून पाहता येणे कठीण आहे. मात्र, अंतराळातून ते स्पष्टपणे दिसून येते. ‘यूएई’चे सुल्तान अल-नेयादी स्काय-वॉक करणारे अरब जगतातील पहिले अंतराळवीर ठरले आहेत. ‘आय ऑफ सहारा’च्या आधी त्यांनी दुबईतील रात्रीचा झगमगाट टिपून घेतला होता.

Back to top button