वेदांची माहिती देणारा सुंदर बगीचा

वेदांची माहिती देणारा सुंदर बगीचा

नवी दिल्ली : जगभरात वेगवेगळ्या थीमवर आधारित अनेक पार्क बनत असतात. आपल्या देशातही अनेक बाग-बगीचे वेगवेगळ्या विषयांवर आधारित बनवण्यात आलेले आहेत. आता नोयडामध्ये वेदांची माहिती देणार्‍या व एकंदरीतच प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारित अशा 'वेद वन पार्क'ची उभारणी करण्यात आली आहे. प्राचीन ऋषीमुनींना समर्पित असा हा खास बगीचा असेल.

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद तसेच आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्यवेद व गांधर्ववेद अशा उपवेदांचा अभ्यास देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अनेकांनी केलेला आहे. आता ऋषीमुनींनी दिलेल्या ज्ञानावर आधारित खास पार्कची उभारणी नोयडाच्या 'सेक्टर-78' मध्ये करण्यात आली आहे. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच पार्क असणार आहे.

बारा एकरांच्या क्षेत्रात हे पार्क बनवण्यात आले आहे. लवकरच त्याचे उद्घाटन होऊन ते लोकांसाठी खुले करण्यात येईल. याठिकाणी चार वेदांवर आधारित वेगवेगळे झोन बनवण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये संबंधित वेदांची माहिती दिली जाईल. तसेच संबंधित वेदानुसार याठिकाणी वेगवेगळ्या वनौषधी व वनस्पती पाहायला मिळतील. या पार्कमध्ये सप्तर्षींच्या नावाचेही वेगवेगळे झोन बनवण्यात आले आहेत.

कश्यप, भारद्वाज, अत्री, विश्वामित्र अशा वेगवेगळ्या ऋषींच्या जीवनाशी संबंधित शिल्पकृती याठिकाणी पाहायला मिळतील. या बागेत बेल, आवळा, अशोक, चंदन, रीठा, पारिजात, मंदार, वड, पिंपळ, अर्जुन, चिंच, औदुंबर असे अनेक वृक्ष पाहायला मिळतील. इथे रोज सायंकाळी वॉटर लेसर शो होईल. त्यामध्ये तीस मिनिटे वेद आणि पुराणांची माहिती दिली जाईल. पार्कमध्ये ओपन जीम, अ‍ॅम्फिथिएटर तसेच रेस्टॉरंटही असेल. 28 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या पार्कमध्ये सर्वांना मोफत प्रवेश असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news