Meta-material : इमारतीचा पाया भूकंपरोधी बनवण्यासाठी ‘मेटा-मटेरियल’ सक्षम | पुढारी

Meta-material : इमारतीचा पाया भूकंपरोधी बनवण्यासाठी ‘मेटा-मटेरियल’ सक्षम

मंडी : आयआयटी मंडीतील संशोधकांना आढळले आहे की इमारतींचा पाया भूकंपरोधी बनवण्यासाठी द्वी-आयामी (टू डी) मेटा-मटेरियल आधारित सामग्री प्रभावी ठरते. मोठ्या शहरांमधील गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेसाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. घरे व इमारतींना भूकंपापासून संरक्षण देण्यासाठी मेटा-मटेरियल मदत करू शकते.

विशिष्ट ‘कम्पोझिट’ सामग्रींना ‘मेटा-मटेरियल्स म्हटले जाते. त्यांना कृत्रिमरीत्या डिझाईन केले जाते व त्यांची निर्मिती केली जाते. त्यांच्यामधील अनोखे गुण हे त्यांच्या रासायनिक संरचनेऐवजी त्यांच्या आंतरिक सूक्ष्म संरचनांमधून येत असतात. विशिष्ट भूमिती रचनेत अणू व्यवस्थेमध्ये परिवर्तन करून मेटा-मटेरियल्समध्ये असे गुण आणि क्षमतांचा समावेश केला जातो. ते नैसर्गिकरीत्या सामग्रीत आढळू शकत नाहीत.

वेगवेगळ्या भूकंप लहरींना नियंत्रित करण्यासाठी मेटा-मटेरियल्स निम्न किंवा उच्च आवृत्तीच्या बँड अंतरालास प्रेरित करतात. या मटेरियल्सचा उपयोग मुख्यतः मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग, ध्वनी अथवा विद्युत चुंबकीयसारख्या तरंगांना निर्देशित करणार्‍या संरचना (वेव्हगाईडस्), प्रसार प्रतिपूर्ती, स्मार्ट अँटेना आणि लेन्समध्ये असतो. आयआयटी मंडीचे प्रमुख संशोधक डॉ. अर्पण गुप्ता यांनी सांगितले की पायाला विशिष्ट प्रकारे डिझाईन करून इमारतीला जास्तीचे नुकसान न पोहोचवता भूकंपाच्या लहरींना परतवून लावता येऊ शकते. प्रत्येक इमारतीसाठी चांगला पाया असणे हे महत्त्वाचे असते. मात्र, इथे पायाच्या डिझाईनमध्ये आवधिकतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तिला ‘मेटामेट्री फाऊंडेशन’ असे म्हटले जाते.

भौतिक गुणांची अशी आवधिक भिन्नता तरंगांच्या प्रतिबिंबांना जन्म देऊ शकते ज्यामुळे त्या पायावर उभ्या असलेल्या इमारतीचे रक्षण होते.

Back to top button