कॅलिफोर्नियाजवळ आढळला दुर्मीळ सफेद किलर व्हेल | पुढारी

कॅलिफोर्नियाजवळ आढळला दुर्मीळ सफेद किलर व्हेल

न्यूयॉर्क : अमेरिकेत कॅलिफोर्नियाजवळ समुद्रात अत्यंत दुर्मीळ असा सफेद किलर व्हेल मासा आढळून आला. ‘ओर्का’ म्हणजेच ‘ओर्किनस ओर्का’ या प्रजातीच्या माशांचे हे पिल्लू आहे. ते जवळजवळ पूर्णपणे पांढर्‍या रंगाचे आहे. मात्र, त्याच्या फिनवर काही काळे ठिपके आहेत. ‘ल्युसिझम’ या पिग्मेंटशी संबंधित विकाराचा हा परिणाम आहे. यामध्ये एखादा प्राणी पूर्णपणे सफेद न होता त्याच्यामध्ये मूळ रंगाचे काही भाग असतात.

एखाद्या प्राण्यामध्ये पिग्मेंटस् किंवा रंगद्रव्ये पूर्णपणे नसतात त्यावेळी त्याला ‘अल्बिनो’ म्हणतात. असे पशू-पक्षी पूर्णपणे सफेद असतात. ज्यांच्यामध्ये काही पिग्मेंटस् असतात ते पूर्णपणे सफेद नसतात. या स्थितीला ‘ल्यूसिझम’ म्हटले जाते. हे किलर व्हेलचे पिल्लू काही प्रमाणात काळे असल्याने त्याच्यामध्ये ‘ल्युसिझम’ची स्थिती असल्याचे स्पष्ट होते.

या पिल्लास ‘फ्रॉस्टी’ असे नाव देण्यात आले आहे. ते तीन वर्षांचे नर पिल्लू आहे. काही दिवसांपूर्वीच हे पिल्लू अन्य सहा किलर व्हेल माशांसोबत समुद्रात दिसून आले. मालिबूच्या तटापासून तेरा किलोमीटरवर हा समुह आढळला. वन्यजीव छायाचित्रकार मार्क गिरार्डेयू यांनी फ्रॉस्टीची छायाचित्रे व व्हिडीओ टिपला आहे.

Back to top button