

वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे की जगभरातील सुमारे 80 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येशी झगडत आहेत. संपूर्ण जगात 15 ते 29 वर्षे वयाच्या तरुणांमधील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आत्महत्या हे आहे. अशा आत्महत्यांमागे डिप्रेशन हेच असते. आता तज्ज्ञांनी म्हटले आहे की डिप्रेशनला दूर ठेवण्यासाठी रोज चालण्याचा व्यायाम करणे लाभदायक ठरते.
कमी किंवा अतिशय जास्त प्रमाणातील झोप, भोजनातील पोषक घटकांची कमतरता, असंतुलित जीवनशैली, व्यायामाचा अभाव याबरोबरच रोजच्या जीवनातील ताणतणाव आरोग्य बिघडवत आहे. केवळ पौष्टिक आहारामुळेच डिप्रेशनमध्ये 25 ते 30 टक्के घट येऊ शकते. भारतात 14 टक्के लोक मानसिक समस्यांनी त्रस्त आहेत.
4 कोटी लोक डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आणि 5 कोटी लोक एंग्झायटी डिसऑर्डरशी झगडत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा अतिवापरही डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला वाढवत असतो. तसेच सुस्त जीवनशैलीही मानसिक आरोग्य वेगाने बिघडवते.
त्यामुळे स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. त्याचा शरीराबरोबरच मनाला, मेंदूलाही लाभ मिळतो. रोज तीस मिनिटे चालणे किंवा पंधरा मिनिटे सायकलिंग करणे लाभदायक ठरते. त्यामुळे 'फील गुड हार्मोन' असलेले 'एंडॉर्फिन'चा स्राव वाढतो. ज्यावेळी तणाव असतो त्यावेळी चालणे तसेच रोज दहा ते पंधरा मिनिटे दीर्घ श्वास घेणे लाभदायक ठरते.