वर्क फ्रॉम थिएटर! लोक म्हणाले, डेडलाईन सांभाळा! | पुढारी

वर्क फ्रॉम थिएटर! लोक म्हणाले, डेडलाईन सांभाळा!

बंगळूर : ऑफिसचा वर्कलोड आजकाल प्रत्येक कर्मचार्‍यासाठी डोईजड होत चालले आहे. घर असेल किंवा ऑफिस, काम संपतच नाही. सुट्टी असेल तरीही लॅपटॉपवरून घरी काम करत राहावे लागते. वर्क फ्रॉम होमकल्चरने तर यात आणखी बिघाड करून टाकला आहे. जिथे ऑफिसमध्ये 8-9 तास कार्यरत रहायचे, तिथे घरी दिवसभर कामाचे रहाटगाडगे सुरू असते. परिस्थिती आता अशी आली आहे की, लोक जगणं विसरून चालले आहेत. आपले वैयक्तिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक भेटीगाठीदरम्यानही लोक आपल्या फोन व लॅपटॉपला चिकटून असतात कारण ऑफिसचे काम सर्वात महत्त्वाचे. अर्थातच, यात आयटीचे कर्मचारी आघाडीवर आहेत.

आयटी कर्मचार्‍यांवर कसा वर्कलोड असतो, याचे मूर्तिमंत उदाहरण अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरूनदेखील दिसून आले. या व्हिडीओेमध्ये एक व्यक्ती चक्क थिएटरमध्ये लॅपटॉपवर काम करताना दिसून आला. हा व्हिडीओे बंगळूरमधील असल्याचे सांगितले जात असून, या व्हिडीओला चक्क 44 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या.

व्हायरल व्हिडीओत सदर व्यक्ती थिएटर हॉलमध्येच आपला लॅपटॉप उघडून ऑफिसचे काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि यावर लोक हैराण झाले नसते तर नवल होते. टेक्निकल फिल्डमध्ये कर्मचार्‍यांना कंपनी लॅपटॉप देते आणि थोडक्यात 24 तास व्यस्त ठेवते. ज्यावेळी काम पाठवले जाते, त्यावेळी त्याची डेडलाईन देखील सांगितली जाते. यामुळे या कर्मचार्‍यांनादेखील गत्यंतर नसते.

बंगळूरमधील या व्हिडीओत असे दिसून आले की, चित्रपट सुरू होण्यासाठी थोडासा अवधी होता आणि स्क्रीनवर जाहिरात सुरू होते. त्याचवेळी एक व्यक्ती लॅपटॉपवर काम करत असल्याचे निदर्शनास आले. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केला गेल्यानंतर काही क्षणातच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. ‘चित्रपट पाहण्याच्या रिलॅक्सेशन टाईममध्येदेखील काम संपत नाही’, असे एक युजर म्हणाला, तर आणखी एका युजरने मिश्कीलपणे नमूद केले, ‘डेडलाईन जवळ आली असेल. डेडलाईन सांभाळा!’

Back to top button