इजिप्तमध्ये मिळाली बुद्धाची प्राचीन मूर्ती अन् शिलालेख! | पुढारी

इजिप्तमध्ये मिळाली बुद्धाची प्राचीन मूर्ती अन् शिलालेख!

काहिरा : भारत प्रदीर्घ कालावधीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करत आला असून, याचा दाखला इजिप्तमध्ये पाहायला मिळाला. इजिप्तमध्ये बुद्धाची प्राचीन मूर्ती मिळाली असून, ही मूर्ती रोमन साम्राज्याच्या कालावधीतील असल्याचे मानले जात आहे. याशिवाय, येथे संस्कृतमध्ये लिखित शिलालेख देखील मिळाले आहेत. ही मूर्ती 71 सेंटीमीटर लांब आहे व दगडापासून निर्मिलेली आहे. मूर्तीच्या पायात कमळाचे फूलदेखील आहे.

इजिप्तमधील बेरेनिस बंदरानजीक ही प्राचीन मूर्ती मिळाली. रोमन साम्राज्यादरम्यान भारत व इजिप्त यांच्यात व्यावसायिक देवाणघेवाण होत असे, याचा हा दाखला मानला जातो. इजिप्तच्या पर्यटन व पुरातत्त्व मंत्रालयाने सदर मूर्ती मिळाली असल्याचे जाहीर केले. आश्चर्य म्हणजे जेथे मूर्ती मिळाली त्या बेरेनिस बंदरावर 1994 पासून शोधकार्य सुरू आहे.

येथील पुरातत्त्व खात्यातील सर्वोच्च परिषद महासचिव डॉ. मुस्तफा वजिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमन युगादरम्यान बेरेनिस येथे भारतीय जहाजे येत असत आणि काळी मिरी, कपडे व हस्तीदंत येथे आणत असत. सध्या मिळालेल्या मूर्तीमुळे या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.

Back to top button