डॉक्टरांनाही हैराण करून सोडणारे ‘बाहुबली बाळ!’ | पुढारी

डॉक्टरांनाही हैराण करून सोडणारे ‘बाहुबली बाळ!’

टेक्सास : बाळाच्या जन्माच्या वेळी त्याचे वजन किती असते, हे खूप महत्त्वाचे असते. काही वेळा कमी वजन असल्याने बाळाला अनेक आजारांचा धोका असतो. आता असे कमी होते की, एखाद्या बाळाचे वाढते वजन पाहून त्याचे पालक हैराण व्हावेत. पण, टेक्सास येथील एका बाहुबली बाळाने केवळ पालकांनाच नव्हे, तर त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनादेखील हैराण करून टाकले आहे.

जेलेन असे या छोट्या मुलाचे नाव असून, दिवसागणिक त्याचे प्रमाणापेक्षा वाढते वजन बुचकळ्यात टाकणारे ठरत आहे. या मुलाचा जन्म झाला, त्यावेळी त्याचे वजन सामान्य मुलांसारखेच होेते. पण, जसजसे त्याचे वय वाढू लागले, त्याप्रमाणे त्याचे वजन प्रमाणापेक्षाही अधिक वाढू लागले. या वाढत्या वजनामुळे त्याला त्याच्या वयाचे कपडेही बसत नव्हते.

अमेरिकेतील टेक्सास येथे राहणारी 31 वर्षीय सलित्झा ही जेलेनची आई अ‍ॅथलिट ट्रेनर आहे. जेलेनचा जन्म झाला, त्यावेळी त्याचे वजन 3.6 किलोग्रॅम इतके होते. त्यानंतर मात्र काही महिन्यांतच सारे चित्र बदलले आणि जेलनचे वजन अतिशय झपाट्याने वाढू लागले. आता जेलेनला डॉक्टरांकडे घेऊन जातात, त्यावेळी तो 12 ते 18 महिन्यांचा नव्हे, तर 4 वर्षांचा आहे, असेच नवख्या डॉक्टरांना वाटते. अ‍ॅथलिट ट्रेनर सॅलित्झाचा मोठा मुलगा 4 वर्षांचा आहे. पण, या मुलाचे कपडेही जेलेनला 18 व्या महिन्यातच फिट होत आहेत!

Back to top button