‘तिच्या’साठी अनोखे नावच ठरतेय तिची अडचण! | पुढारी

‘तिच्या’साठी अनोखे नावच ठरतेय तिची अडचण!

वेस्ट मिडलँड : व्यक्ती कोणीही असो, नाव हीच त्या व्यक्तीची ओळख असते. नावात आदर असतो, नावात दराराही असतो. पालकदेखील मुलाचे नाव ठेवण्यापूर्वी हजारवेळा विचार करतात. नावाच्या अर्थाचा मुलाच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडावा, अशी त्यामागे धारणा असते. एका 40 वर्षांच्या महिलेसाठी मात्र जणू तिचे अनोखे नावच अडचण ठरत आले असून यावर काय मार्ग काढायचा, ही तिच्यासाठी खर्‍या अर्थाने डोकेदुखीच झाली आहे आणि आपले खरे नाव हेच आहे, असे सांगण्यासाठी कित्येक ठिकाणी तिला आपले आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागते!

1980 च्या दशकात या कन्येचा जन्म झाला आणि तिच्या पालकांनी एका बँडवरून प्रभावित होत आपल्या कन्येला ‘एबीबीए’ असे अनोखे, पण विचित्र नाव दिले. 80 च्या दशकात स्वीडिश सुपरग्रूप म्युझिक बँड एबीबीए अतिशय प्रसिद्ध होते आणि त्यावरून तिच्या पालकांनी तिचे एबीबीए असे नामकरण केले. पण, आता 40 वर्षांची झालेली त्यांची ही कन्या आपले नाव एबीबीए असे आहे, असे सांगत त्यावेळी लोक तिच्यावर विश्वास ठेवायलादेखील तयार राहत नाहीत. आणखी कोणाचेच नाव एबीबीए असे नसल्याने समोरील लोक गोंधळतात आणि ही महिला आपली गंमत तरी करत नाही ना, अशीच शंका त्यांना येते.

अशा वेळी लोक तिला आणखी एकदा आपले नाव आणखी एकदा सांगायला लावतात आणि तरीही ती पुन्हा एकदा एबीबीए असेच सांगते, त्यावेळी या लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. हेच नाव आहे का, याची खातरजमा करून घेण्यासाठी तिच्याकडून अनेकदा आयडी कार्डदेखील मागितले जाते. एका रिपोर्टमध्ये ही महिला म्हणते की, लोक जितक्या वेळा माझ्या नावाबद्दल मला विचारतात, त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला अगदी एक डॉलर दिला असता तरी मी आज कोट्यधीश झाले असते!

आणखी आश्चर्याची बाब म्हणजे एबीबीए हिच्या आणखी दोन भावंडांची नावे मात्र सर्वसामान्य नावांप्रमाणे आहेत आणि केवळ एबीबीए हिलाच आपल्या अनोख्या नावाचा ‘याचि डोळा, याचि देही’ त्रास होतो आहे.

Back to top button