

लंडन : रस्त्याची निर्मिती सुरक्षेसाठी केली जाते, जेणेकरून सुरक्षितपणे लोक त्यावरून ये-जा करू शकतील. याशिवाय, पादचार्यांसाठी खास फूटपाथ तयार केले जातात. त्याचप्रमाणे सायकलस्वारांसाठी स्वतंत्र लेन तयार केली जाते. या सर्वामागे एकच कारण असते, ते म्हणजे कोणालाही इजा होऊ नये व काहीही नुकसान होऊ नये. पण, हीच लेन जर सातत्याने अपघातास कारणीभूत ठरत असेल, तर मात्र डोक्याला हात लावण्यासारखी परिस्थिती असेल. युकेमध्ये तयार केला गेलेल्या एका सायकल लेनला जगातील सर्वात धोकादायक लेन म्हटले जात आहे.
सदर सायकल लेन गतवर्षी मार्चमध्ये सामान्यांसाठी खुले केले गेले, त्यावेळी त्याच्या निर्मितीसाठी 9 महिन्यांचा कालावधी लागला होता. ही लेन ऑप्टिकल इल्युजनसह तयार करण्यात आली. शिवाय, त्यावेळी गंमतीने काही नवे प्रयोग राबवले गेले. पण, आता हीच बाब नागरिकांसाठी त्रासाची ठरत आली आहे. ही सायकल लेन सुरू झाल्यानंतर त्यावर 59 लोक पडले असून, काहींना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. अगदी अलीकडेच एका पेन्शनरलादेखील येथे दुखापत झाली.
डेव डॉसन असे या पेन्शनरचे नाव असून, त्यांनी ही लेन बंद करावी, अशा आशयाची लेखी मागणी प्रशासनाकडे केली आहे. डेव यांना एकाच दिवसात दोनवेळा या लेनवर दुखापत झाल्याने त्यांनी याविरोधात प्रशासनाकडे धाव घेतली. ऑप्टिकल इल्युजनमुळे त्यांना रस्ता सरळ आहे, असे वाटले. पण, प्रत्यक्षात तेथे पायरी होती आणि त्याला थडकून डेव कोसळले. परत येत असताना डेव यांनी पुन्हा या लेनचा वापर केला आणि यावेळीदेखील ते घसरून पडले. दोन वेळा कोसळल्यानंतर त्यांना दोन्ही हातांना व गुडघ्याला दुखापत झाली.
प्रशासनाने या लेनची ऑप्टिकल इल्युजनसह का निर्मिती केली, याचे उत्तर कोणाकडेही नाही. प्रथम असे वाटत होते की, या लेनवरून चालणे मजेदार असेल. पण, सदर लेन आता धोकादायक बनले आहे. रोज येथे सातत्याने कोणी ना कोणी पडून रक्तबंबाळ होते. या लेनची रचना अशी विचित्र आहे की, जिथे सरळ रस्ता आहे असे वाटते, तेथे वळण असते आणि जेथे वळण आहे, असे वाटते, तेथे सरळ रस्ता असतो. थोडक्यात, दोन्हीवेळा आपटणे ठरलेलेच!
आतापर्यंत अनेकांनी केलेल्या तक्रारी फेटाळून लावले गेले आहेत. आता आणखी किती दुर्घटनांनंतर सदर लेन बंद केली जाणार, याचीच स्थानिकांना प्रतीक्षा आहे.