एकाग्रतेसाठी अमेरिकेत लोकप्रिय ठरतेय जोगा! | पुढारी

एकाग्रतेसाठी अमेरिकेत लोकप्रिय ठरतेय जोगा!

सॅन फ्रॅन्सिस्को : सध्याच्या धकाधकीच्या युगात योगाचे, ध्यानधारणेचे वेगळे महत्त्व सांगण्याची गरज नाही. पण पाश्चिमात्य देशात एकाग्रतेसाठी अगदी खेळाडूंना देखील योगाचे धडे दिले जातात. यातीलच योगाची एक नवी प्रॅक्टिस शोधून काढली आहे ती टोरोंटा येथील जाना वेब हिने अन् या प्रॅक्टिसचे नाव आहे जोगा!

जाना वेब यांनी जोगा प्रॅक्टिस विकसित केली असून ते सध्या अमेरिकन बास्केटबॉल संघातील खेळाडूंना याचे धडे देतात. खास करून खेळाडूंसाठीच त्यांनी ही प्रॅक्टिस विकसित केली आहे. अमेरिकन बास्केटबॉल संघ गोल्डन स्टेट वॉरियर्स संघातील केवोन लुनी व संघसहकारी मोसेस मुडी यांनी 40 मिनिटे जोगा प्रॅक्टिस केल्यानंतर माध्यमांना याचा आपल्याला कसा लाभ झाला, हे विशद केले. लुनीने यावेळी प्रत्येक सामन्यापूर्वीच्या तयारीत जोगाचा समावेश असतो, असे सांगितले.

लुनी हायस्कूलमध्ये मिलवॉकी बक्ससह योगा करत होता. 2015 मध्ये त्याला वॉरियर्सने निवडले. मात्र, कमरेच्या दुखापतीमुळे तो हंगामातील बराच काळ खेळू शकला नाही. 2019 एनबीए फायनल्सदरम्यान कॉलरबोनची समस्या उद्भवली. 2020 मध्ये सर्जरी करवून घ्यावी लागली. 2020-21 मध्ये पुनरागमन केले असले तरी, त्यात फारसे यश आले नाही. त्यानंतर त्याने जाना वेब यांचे सेशन्स सुरू केले. याचा त्याला बराच फायदा झाला. जाना वेबने दिलेल्या माहितीनुसार, योगाप्रमाणेच जोगा प्रॅक्टिसमध्ये शारीरिक आसन, श्वास घेणे, रिलॅक्स होणे आदी तंत्राचा समावेश आहे. योग आध्यात्मिक रूप जागृत करते तर जोगाचा उद्देश प्रदर्शन सुधारणे आणि एकाग्रता वाढवणे हा असतो. जोगामुळे खेळाडूंना दुखापतीतून लवकर सावरणे देखील शक्य होते.

जोगा थ्री डायमेन्शनल न्यूरोमस्क्युलर सिस्टीम असून त्या माध्यमातून मसल मेमरी बिल्ड होते. यातील श्वास घेण्याची व रिलॅक्सेशनची पद्धत खेळाडूंचे मन शांत राखण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते, असा जाना यांचा दावा आहे.

Back to top button