‘डेमोस’च्या छायाचित्रावरून उलगडला मंगळाचा भूतकाळ | पुढारी

‘डेमोस’च्या छायाचित्रावरून उलगडला मंगळाचा भूतकाळ

दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या ‘होप’ या ऑर्बिटरने मंगळाचा चंद्र ‘डेमोस’ची अतिशय जवळून छायाचित्रे टिपली आहेत. मंगळाच्या दोन छोट्या आकाराच्या चंद्रांपैकी हा एक आहे. 10 मार्चला हे ऑर्बिटर डेमोसजवळून गेले होते व त्यावेळी त्याची ही छायाचित्रे टिपण्यात आली होती. या छायाचित्रांच्या अभ्यासावरून मंगळाचा भूतकाळ उलगडला आहे. मंगळ ज्या घटकांनी बनलेला आहे त्याच घटकांनी डेमोसही बनलेला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यावरून असे दिसते की मंगळाने हा ‘पकडून’ ठेवलेला बाह्य उपग्रह नसून तो त्याचाच एक भाग आहे.

मंगळ आणि डेमोसबाबत काही नवी निरीक्षणे यामधून नोंदवण्यात आलेली आहेत. त्याची माहिती युरोपियन जियोसायन्सेस युनियनच्या बैठकीत देण्यात आली. दुबईतील मोहम्मद बिन रशिद स्पेस सेंटरमधील मोहिमेचे प्रमुख हेस्सा अल मात्रोशी यांनी सांगितले की या छायाचित्रात डेमोसच्या पार्श्वभूमीवर दिसणारा मंगळ अतिशय सुंदर आहे. गेल्या अनेक दशकांपासून मानव मंगळाविषयी संशोधन करीत आलेला आहे. मात्र, आपण पाठवलेली याने बहुतांशी मंगळाच्याच पृष्ठभागाजवळ राहतात. त्यामुळे त्याच्या चंद्रांची केवळ एकच बाजू आपल्याला दिसते. मात्र, ‘होप’ ने असे न करता या चंद्राच्या जवळूनही फेरी मारली.

‘होप’ला ‘अमिराटस् मार्स मिशन’ (ईएमएम) असेही म्हटले जाते. 2020 मध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली होती व 2021 मध्ये ते मंगळाजवळ पोहोचले. एखाद्या अरब देशातून अन्य ग्रहावर पाठवण्यात आलेले हे पहिलेच यान ठरले आहे. ‘होप’ने टिपलेले डेमोसचे छायाचित्र आता संशोधनाचा विषय बनलेले आहे. हा चंद्र अवघ्या 12.4 किलोमीटर रुंदीचा आहे. मंगळाला अन्य एखाद्या खगोलाची धडक होऊन त्याचा हा तुकडा अंतराळात गेला असावा असे दिसून येते.

Back to top button