50 फुटांवर कसरती आणि गमावला जीव! | पुढारी

50 फुटांवर कसरती आणि गमावला जीव!

बीजिंग : कधी कधी नसते धाडस किंवा अतिआत्मविश्वास दगा देत असतो. निव्वळ निष्काळजीपणामुळे प्राण संकटात टाकणे हे चुकीचेच कृत्य ठरते. आता चीनमध्ये मंचावर कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय लाईव्ह परफॉर्म करत असतानाच तब्बल 50 फूट उंचीवरून खाली पडून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

अ‍ॅक्रोबॅट असणारी ही महिला मंचावर आपल्या पतीसह कसरतींचे प्रात्यक्षिक करीत होती. यावेळी तब्बल 45 ते 50 फुटांवरून महिला खाली पडली आणि ठार झाली. मृत्यूचा हा थरार कॅमेर्‍यात लाईव्ह कैद झाला आहे. ट्विटरला अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. अनहुई प्रांतात ही घटना घडली आहे.

या व्हिडीओत जीमनॅस्ट असणारी महिला आपल्या पतीसह मंचावर परफॉर्म करताना दिसत आहे. दोघेही परफॉर्म करण्यासाठी उंचावर जाताच काही वेळात दुर्घटना घडते. स्टंट करत असताना पती पायामध्ये पत्नीला पकडण्यात अपयशी ठरतो आणि महिला थेट खाली येऊन कोसळते. तिचा हात निसटल्याने ही दुर्घटना घडल्याचेही सांगितले जाते. ही दुर्घटना घडली तेव्हा दोघेही 45 ते 50 फूट उंचावर होते. इतक्या उंचीवरून खाली पडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अधिकार्‍यांनी याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. महिलेचे नाव सन आणि तिच्या पतीचे नाव झँग आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र परफॉर्म करत होते. तसेच उपस्थितांवर आपली छाप पाडण्याच्या हेतूने ते अनेकदा सेफ्टी बेल्टशिवाय स्टंट करीत असत.

संबंधित बातम्या
Back to top button